टी20 वर्ल्ड कप दरम्यान नवीन मालिकेची घोषणा; अफगाणिस्तानच्या यजमानपदाखाली ‘हा’ संघ पहिल्यांदाच खेळणार

आयसीसीच्या टी-२० विश्वचषकाचा थरार सध्या शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेच्या धामधुमीतच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका नवीन मालिकेची घोषणा केली आहे. अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय (ODI) सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तान संघ श्रीलंकेचे यजमानपद भूषवणार आहे. या मालिकेतील सर्व सामने शारजाह आणि दुबई येथे खेळवले जातील. मालिकेची सुरुवात १३ मार्चपासून होणार असून दौऱ्याचा शेवटचा सामना २५ मार्च रोजी खेळला जाईल.
श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेची माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही दुसरी द्विपक्षीय मालिका असेल. यापूर्वी २०२४ मध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या दौऱ्यावर आधी ३ सामन्यांची टी-२० मालिका होईल, तर २० मार्चपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. अद्याप या मालिकेसाठी संघांची (Squad) घोषणा करण्यात आलेली नाही.
टी-२० विश्वचषकातील दोन्ही संघांच्या कामगिरीवर नजर टाकली, तर अफगाणिस्तानचा संघ साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर पडला आहे. दुसरीकडे, श्रीलंकेने दमदार कामगिरी करत ‘सुपर ८’ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. मात्र, सुपर ८ च्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. आता उरलेल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून उपांत्य फेरीत (Semi-final) धडक मारण्याकडे श्रीलंकेचे लक्ष असेल.
Comments are closed.