रणजी ट्रॉफी: कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यात शुभम पुंडीरचे शतक, जम्मू-काश्मीरचा पहिला डाव 250 पार

भारतीय स्थानिक क्रिकेटमधील मानाच्या स्पर्धांमधील एक अशी रणजी ट्रॉफी. या स्पर्धेच्या २०२५-२६ हंगामाचा अंतिम सामना कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर यांच्यात सुरू आहे. हा सामना २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान हुबळीमध्ये खेळला जात आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरचा कर्णधार पारस डोग्राने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्याकडून यावेर हसन, शुभम पुंडीर आणि अब्दुल समाद यांनी उल्लेखनीय खेळी केली.

शुभमचे हे शतक खास राहिले कारण त्याने एकेरी-दुहेरी धाव न घेता थेट षटकार मारत पूर्ण केले. त्याने १८६ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या. याबरोबरच तो रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत शतक करणारा जम्मू-काश्मीरचा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचे हे बाद फेरीतील पहिले आणि त्याच्या प्रथम श्रेणीच्या कारकिर्दीतील चौथे शतक ठरले आहे. त्याने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरींमध्ये काही खास कामगिरी केली नाही. त्या २ सामन्यांमधील ४ डावांमध्ये त्याने केवळ ४० धावा केल्या होत्या. तसेच शुभमचे हे या हंगामातील दुसरे शतक ठरले आहे.

केएससीए हुबळी क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या या सामन्यात जम्मू-काश्मीरने २५०च्या वर धावा केल्या आहेत. त्यांच्या दोन विकेट्स पडल्या असून या दोन्ही प्रसिद्ध कृष्णाने घेतल्या आहेत. त्यांची पहिलीच विकेट १८ धावसंख्येवर पडली. त्यानंतर यावेर आणि शुभम यांनी संयमी खेळ केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली.

यावेर ८८ धावा करत बाद झाला. त्यांनतर शुभमने अब्दुलसोबत डाव सांभाळला. तसेच पारस रिटायर्ड-हर्ट झाला. त्याचे त्यांना काही नुकसान झाले नाही. कारण शुभम आणि अब्दुलने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. दोघेही खेळपट्टीवर उपस्थित असून पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. शुभम ११७ धावा आणि अब्दुल ५२ धावांवर नाबाद आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरचा पहिला डाव २ बाद २८४ धावा असा झाला आहे.

Comments are closed.