टी20 वर्ल्ड कप सेमीफायनलचे तिकीट नक्की! पण सामना होण्याची शक्यता कमी?

टी20 वर्ल्डकपचा ज्वर हळूहळू शिगेला पोहोचताना दिसत आहे. टीम इंडियाने जेतेपद आपल्याकडेच राखावं यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी सेमी फायनल आणि फायनलसाठीची तिकीटविक्री आजपासून सुरू होत आहे. मात्र तिकीट मिळाल्यानंतरही सामना ठरलेल्या शहरात, ठरलेल्या मैदानात होईल का याविषयी काहीही शाश्वती नाही.
आयसीसीनेच तिकीटविक्री संदर्भात पत्रक जारी केलं आहे. पण या पत्रकानुसार सेमी फायनल आणि फायनल हा जरतरचा खेळ असणार आहे. कसं ते समजून घेऊया. सेमी फायनलचा पहिला मुकाबला 4 मार्चला तर दुसरी लढत 5 मार्चला होणार आहे. जेतेपदासाठी महामुकाबला ८ मार्चला रंगणार आहे.
सेमी फायनल 1चा मुकाबला आयसीसीच्या म्हणण्यानुसार ‘फ्लोटिंग व्हेन्यू अरेंजमेंट’ असणार आहे. हा सामना कोलंबोतल्या आर.प्रेमदास स्टेडियमवर किंवा भारतात इडन गार्डन्स, कोलकाता इथे होणार आहे. सेमी फायनलचा दुसरा मुकाबला मुंबईत होणार आहे.
पाकिस्तानचा संघ सेमी फायनलसाठी पात्र झाला तर सेमी फायनल 1ची लढत 4 मार्चला कोलंबोत होईल. पाकिस्तानच्या संघाने सेमी फायनलचा टप्पा गाठला नाही आणि श्रीलंकेने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला तर आणि भारत वगळता अन्य संघ समोर असेल तर ही लढत कोलंबोत होईल. वर उल्लेखलेल्या समीकरणांपैकीच काहीच नसेल आणि भारत-श्रीलंका एकमेकांसमोर असतील तर सेमी फायनल१चा मुकाबला कोलकाताच्या इडन गार्डन्स इथे होईल.
पाकिस्तानच्या संघाने फायनलपर्यंत आगेकूच केली तर फायनल कोलंबोत इथे खेळवण्यात येईल. पाकिस्तानचा संघ फायनलमध्ये नसेल तर फायनल अहमदाबाद इथे खेळवण्यात येईल. या सगळ्याचा अर्थ सोप्या शब्दात सांगायचा तर कोलंबो, कोलकाता आणि अहमदाबाद इथे होणाऱ्या सामन्यांसाठी चाहत्यांना तिकीटं मिळतील पण तिथेच सामना होईल याची कोणतीही खात्री किंवा हमी देता येणार नाही. ठरलेल्या ठिकाणी सामना न झाल्यास चाहत्यांना त्यांचे पैसे परत देण्यात येतील असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.
Comments are closed.