IND vs ZIM: टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल निश्चित! रिंकू सिंगच्या जागी या खेळाडूला संधी मिळणार

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या ‘सुपर-8’ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला पराभवाचा धक्का बसला, ज्यावरून टीम इंडियावर आता टीका होत आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पुढील सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच स्टार फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) अचानक संघ सोडून घरी परतल्यामुळे टीम इंडियासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याची तयारी सुरू असतानाच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. स्टार फलंदाज रिंकू सिंग सराव सत्राला पोहोचला नाही आणि घरच्या काही वैयक्तिक कारणांमुळे (वडिलांची प्रकृती ठीक नसल्यामुळे) तो घरी परतला आहे. रिंकू भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा महत्त्वाचा भाग होता, पण आता त्याच्या अनुपस्थितीत संघात बदल करणे अनिवार्य झाले आहे.
रिंकू सिंग उपलब्ध नसल्यास त्याच्या जागी अक्षर पटेलला (Axar Patel) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अक्षर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना खेळला नव्हता. त्याच्या येण्याने टीम इंडियाला गोलंदाजीचा एक जास्तीचा पर्याय मिळेल आणि फलंदाजीलाही मजबूती येईल. विशेष म्हणजे, रिंकू सिंग सध्या फारशा चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता, त्यामुळे अक्षरचा अनुभव संघासाठी फायदेशीर ठरू शकतो.
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारताला झिम्बाब्वेविरुद्धचा हा सामना केवळ जिंकावाच लागणार नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.
Comments are closed.