अमेरिका-इराण वादात चीनची एन्ट्री! तेहरानला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवण्याची आखत आहे योजना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील जुना संघर्ष सर्वश्रुत असतानाच आता या वादात चीनने उघडपणे उडी घेतली आहे. इराणला अत्यंत अत्याधुनिक आणि विनाशकारी ‘CM-302’ सुपरसोनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रे पुरवण्याची योजना चीनने आखली असून, या संरक्षण करारामुळे पाश्चिमात्य देशांच्या गोटात खळबळ माजली आहे.

चीनचे हे क्षेपणास्त्र विमानवाहू युद्धनौकांचा काळ मानले जाते. आवाजाच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने अधिक वेगाने धावणाऱ्या या क्षेपणास्त्राला रोखणे अमेरिकेच्या प्रगत रडार यंत्रणांसाठीही मोठे आव्हान ठरणार आहे. विशेष म्हणजे साधारण २९० किलोमीटरपर्यंतचा अचूक पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या या शस्त्रास्त्रामुळे पर्शियन गल्फ आणि अरबी समुद्रातील लष्करी समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. इराणच्या ताफ्यात हे तंत्रज्ञान सामील झाल्यामुळे या भागात तैनात असलेल्या अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकांवर थेट धोक्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

एकीकडे अमेरिका इराणवर विविध आर्थिक आणि लष्करी निर्बंध लादून त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असताना, चीनने मदतीचा हात पुढे केल्याने अमेरिकेच्या रणनीतीला मोठा धक्का बसला आहे. या करारामुळे केवळ लष्करी ताकदच वाढणार नाही, तर आखाती देशांमध्ये इराणचे वर्चस्व अधिक घट्ट होणार आहे. इराणकडे आधीच ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा साठा उपलब्ध आहे, परंतु चीनच्या या सुपरसोनिक तंत्रज्ञानामुळे इराणची समुद्रातील प्रहार करण्याची क्षमता कैक पटींनी वाढणार आहे. या घडामोडींमुळे इस्रायलनेही आपली चिंता व्यक्त केली असून, संपूर्ण जगाचे लक्ष आता या नव्या चीन-इराण आघाडीकडे लागले आहे.

Comments are closed.