इंग्लंडची कमाल! सलग 5व्यांदा सेमीफायनलमध्ये धडक; ब्रूकच्या शतकाने लागली लॉटरी

इंग्लंडने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ च्या एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानवर पाच चेंडू शिल्लक असताना दोन विकेट्सने विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. कर्णधार हॅरी ब्रुकने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम शतक करत संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ९ बाद १६४ धावा केल्या. साहिबजादा फरहानने ४५ चेंडूत ६३ धावा केल्या. त्याला फखर जमान (२५) ने चांगली साथ दिली. इंग्लंडकडून लियाम डॉसन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात २४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. जेमी ओव्हरटन आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
१६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टला बाद केले आणि पुढच्याच षटकात जोस बटलरला स्वस्तात माघारी पाठवले. तथापि, हॅरी ब्रुकने शांत आणि आक्रमक फलंदाजीने डाव सावरला. त्याने सॅम करनसोबत ४५ धावांची आणि विल जॅक्ससोबत ५२ धावांची महत्त्वाची भागीदारी करून सामना इंग्लंडच्या बाजूने केला.
ब्रुकने ५० चेंडूत शतक पूर्ण करून पाकिस्तानी गोलंदाजांवर दबाव आणला. त्याच्या खेळीत १० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. शेवटच्या षटकात जोफ्रा आर्चरने चौकार मारून इंग्लंडला ८ बाद १६६ धावांपर्यंत पोहोचवले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
या विजयासह, इंग्लंड सलग पाचव्यांदा टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला. हॅरी ब्रुकची ही खेळी टी-२० विश्वचषकात इंग्लंडच्या कर्णधाराने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली.
Comments are closed.