केरळ आता 'केरळम' होणार
राज्याच्या नामपरिवर्तनाला केंद्रीय मंत्रिमंडळ संमती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केरळ हे राज्य यापुढे ‘केरलम’ या नवीन नावाने ओळखले जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नामपरिवर्तनाला संमती देण्यात आली आहे. ही बैठक मंगळवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत पार पडली. केरळ राज्याचे नामपरिवर्तन करावे, असा प्रस्ताव केरळच्या राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला होता. या प्रस्तावाला आता केंद्रीय मंत्रिमंडळाची संमती मिळाल्याने या राज्याचे आता नवे नामकरण होणार ही बाब निश्चित मानली जात आहे. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. केरळच्या विधानसभेने या नामकरणाचा प्रस्ताव 24 जून 2024 या दिवशी एकमुखाने संमत केला आहे.
असाच प्रस्ताव केरळ विधानसभेने ऑगस्ट 2023 मध्येही संमत केला होता. तथापि, त्यावेळी केंद्रीय गृहविभागाने या प्रस्तावात सुधारणा सुचविल्या होत्या. तसेच काही तांत्रिक समस्याही केरळ सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यामुळे केरळ विधानसभेत हा प्रस्ताव 2024 मध्ये पुन्हा मांडण्यात येऊन तो संमत करण्यात आला. केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्वत: हा प्रस्ताव विधानसभेत सादर केला होता. या प्रस्तावाला केरळमधील एकाही राजकीय पक्षाने विरोध पेलेला नाही. त्यामुळे तो विधानसभेतही एकमुखाने संमत झाला.
नामपरिवर्तनाचे कारण काय…
केरळची राज्यभाषा मल्याळम ही आहे. केरळमधील बहुसंख्य लोकांची ती मातृभाषाही आहे. या भाषेत केरळचा उल्लेख ‘केरलाम’ असाच केला जातो. त्यामुळे या राज्याचे नाव केरलम असे असावे, अशी मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून करण्यात येत आहे. तथापि, भारताच्या राज्यघटनेच्या प्रथम आवृत्तीत या राज्याचे नाव ‘केरळा’ असे नेंदविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यघटनेतील नावाचे परिवर्तन करावे आणि ते ‘केरलम’ करण्यात यावे, अशी विनंती केरळ सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात आली होती. आता ती मान्य झाली आहे.
निवडणुकीच्या आधी…
केरळमध्ये येत्या मार्च-एप्रिलमध्ये तीन अन्य राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्यासह विधानसभा निवडणूक होत आहे. त्याआधी केरळच्या राज्य सरकारने हा नामपरिवर्तनाचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार केला होता. आता केंद्रीय मंत्रिमंडळाने हा नव्या नामकरणाचा प्रस्ताव संमत केल्याने प्रदीर्घ काळापासून होत असलेली मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली.
थरुर यांची वैशिष्ट्यापूर्ण प्रतिक्रिया
केरळचे खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांनी या नामपरिवर्तनावर वैशिष्ट्यापूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केरळचे नाव ‘केरलम’ केल्यानंतर ‘केरळीयन’, ‘केरळीय’ किंवा ‘केरलन’ हे शब्द कसे बनतील, केरळच्या नागरीकांना कसे संबोधले जाईल, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. तथापि, केरळ सरकारच्या या प्रस्तावाला काँग्रेसनेही विरोध केला नव्हता. त्यामुळे नामपरिवर्तनाच्या प्रश्नावर केरळमध्ये सर्व राजकीय पक्षांची भूमिका समान आहे. थरुर हे काँग्रेस पक्षाचे नेते असल्याने त्यांनाही या नामकरणाचे समर्थनच करावे लागणार आहे.
राज्याच्या नामपरिवर्तनाची द्वितीय घटना
केरळचे जेव्हा ‘केरलम’ करण्यात येईल, तेव्हा एका संपूर्ण राज्याचे नामपरिवर्तन होण्याची ती भारतातील द्वितीय घटना असेल. यापूर्वी कर्नाटक राज्याचे ‘म्हैसूर’ हे नाव पुसून ‘कर्नाटक’ असे नामकरण करण्यात आले होते. अनेक महानगरांची नावे अशा प्रकारे नवी करण्यात आली आहेत. मद्रासचे चेन्नई, अलाहाबादचे प्रयागराज अशा प्रकारे नामकरणे झालेली आहेत. केरळचे नामपरिवर्तन आता लवकरच करण्यात येईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाऊ लागली आहे.
अनेक दशकांची मागणी पूर्ण
ड केरळचे नाव ‘केरलम’ असे करावे, ही मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची
ड केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा. चर्चेनंतर दिली संमती
ड केरळची राज्यभाषा असणाऱ्या मल्याळममध्ये ‘केरलम’ असाच आहे उल्लेख
ड केंद्र सरकारने मान्यता दिल्यामुळे आता निश्चितपणे होणार नामपरिवर्तन
Comments are closed.