पाकिस्तानची वाट बिकट करणाऱ्या हॅरी ब्रूकला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोणी पाठवले? सत्य आले समोर

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये इंग्लंड पहिला संघ ठरला जो उपांत्य फेरीत पोहचला आहे. याचे सर्वाधिक श्रेय इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकच्या वादळी शतकाला जाते, मात्र यामागचा खरा सूत्रदार कोणी वेगळाच आहे. जेव्हा इंग्लंड ऍशेसमध्ये ४-१ असा हरला तेव्हा अनेकांनी मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने घेतलेल्या निर्णयांवर नाराजी दर्शवली होती. त्याच मॅक्युलमने ब्रूकला पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास पाठवले.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सुपर-८चा सामना मंगळवारी (२४ फेब्रुवारी) खेळला गेला. हा सामना इंग्लंडने शेवटच्या षटकात २ विकेट्सने जिंकला आणि ब्रूकला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला. त्याने १६५ धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ५० चेंडूत शतक पूर्ण केले.
“मॅक्युलम हाच खरा मास्टरमाईंड आहे. त्याने माझ्यासोबत सामन्याच्या सकाळी वरच्या क्रमांकावर फलंदाजी करत पॉवरप्लेमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्याबाबत चर्चा केली होती आणि ते फायद्याचे ठरले”, असे ब्रूकने म्हटले आहे.
ब्रूकने वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे, असे इंग्लंडचा माजी अष्टपैलू मोईन अली यानेही आधीच सुचविले होते. २०२६ मध्ये ब्रूकने आतापर्यंत टी२० मध्ये फक्त ५ व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. आता त्याने पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत शतकी खेळी केली आणि संघाला महत्वाचा विजयही मिळवून दिला.
वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येण्याबाबत सामन्यानंतर ब्रूक म्हणाला, “मी काही काळापासून याचाच विचार करत होतो.” यावरून हा सर्वांचाच निर्णय असल्याचे कळते.
पल्लेकेलेमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टची विकेट गमावली होती. त्यामुळे ब्रूकला लवकरच फलंदाजीसाठी यावे लागले. त्याने येताच सलमान मिर्झाच्या पहिल्याच चेंडूला सीमारेषेवर पाठवत चार धावा वसूल केल्या. नंतर त्याने त्याच षटकात षटकारही मारला. शाहीन आफ्रिदीने जोस बटलरला बाद केल्यावरही ब्रूकची खेळी काही थांबली नाही. त्याने सईम आयुब, मोहम्मद नवाज, शादाब खान यांचा चांगलाच समाचार घेतला. यामध्ये त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले.
ब्रूकची पाकिस्तानविरुद्ध कामगिरी उत्तम आहे. यामुळे त्याला त्याच संघाविरुद्ध फलंदाजीमध्ये त्याचे प्रमोशन करण्याचा विचार सुरू होता. ब्रूकने पाकिस्तानविरुद्ध ६ कसोटीमध्ये ४ शतके आणि अर्धशतक करत ८४.१०च्या सरासरीने ३१७ धावा केल्या आहेत. आता त्याने शतकी खेळी केल्याने त्याची टी२०मध्ये त्यांच्याविरुद्ध सरासरी ६२.६६ झाली आहे.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये सलामीवीर साहिबजादा फरहानने ६३ धावा केल्याने पाकिस्तानने २० षटकात ९ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या होत्या. एक सामना रद्द आणि दुसरा सामना गमावल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Comments are closed.