इस्रोच्या अयशस्वी प्रक्षेपणामागे षडयंत्र?
एनएसए डोवाल यांच्या दौऱ्यानंतर अॅक्शन : होणार उच्चस्तरीय चौकशी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अलिकडच्या मोहिमांमध्ये आलेले तांत्रिक अडसर आणि अपयशामुळे देशाच्या सुरक्षावर्तुळातील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्या इस्रो दौऱ्यानंतर आता या पूर्ण प्रकरणात एक नवे वळण दिसून येत आहे. याप्रकरणी आता तपास समिती स्थापन करण्यात आली आहे. माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन आणि इस्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ यांना सामील करत या विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती इस्रोचे उपग्रह प्रक्षेपक पीएसएलव्ही सातत्याने अयशस्वी ठरण्यामागील ‘प्रणालीत्मक मुद्दे’ आणि संघटनात्मक समस्यांची चौकशी करणार आहे.
अलिकडचे अपयश
1 पीएसएलव्ही-सी62 (12 जानेवारी, 2026) : हे मिशन 16 उपग्रहांना कक्षेत स्थापित करण्यास अपयशी ठरले. रॉकेटचा तिसरा टप्पा प्रज्वलित होऊ शकला नाही, यामुळे प्रक्षेपक समुद्रात कोसळला.
2 पीएसएलव्ही सी-61 (18 मे, 2025) : अशाचप्रकारची समस्या या मिशनमध्येही दिसून आली. यातही तिसरा टप्पा कार्यान्वित झाला नाही, यामुळे सरकारच्या रणनीतिक गरजांसाठी निर्मित ईओएस-09 उपग्रह नष्ट झाला होता.
चौकशीची कक्षा आणि समितीचा उद्देश
सर्वसाधारणणपणे तांत्रिक समित्या कुठला सुटाभाग खराब झाला याचा शोध घेत असतात. परंतु ही नवी समिती उत्पादन, खरेदी आणि रॉकेटच्या विविध घटकांना जोडण्याच्या प्रक्रियांचीही सखोलपणे तपासणी करणार आहे. भारताच्या अंतराळ इकोसिस्टीममध्ये आता अनेक खासगी कंपन्याही सामील आहेत. यामुळे समिती उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी एखादी योग्य प्रक्रिया उपलब्ध आहे का आणि यात कशाप्रकारे सुधारणा केली जाऊ शकते याबाबतही समीक्षा करणार आहे.
समितीचे सदस्य (इस्रोच्या बाहेरील तज्ञ) एप्रिलपूर्वी वर्तमान इस्रो अध्यक्ष व्ही. नारायणन यांना स्वत:चा अहवाल सादर करतील. भारताच्या अंतराळ आयोगाचे सदस्य आणि एनएसए डोवाल यांनी 3 फेब्रुवारी रोजी विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचा दौरा केला होता, जो बहुधा पीएसएलव्ही-सी62 च्या अपयशाशीच निगडित होता.
जुन्या चौकशी प्रक्रियांमध्ये बदल
अहवाल सार्वजनिक न होणे : ऐतिहासिक स्वरुपात इस्रो रॉकेट अपयशांच्या कारणांच्या चौकशीसाठी एक ‘अपयश विश्लेषण समिती’ (एफएसी) निर्माण करते आणि त्याच्या निष्कर्षांना सार्वजनिक करते. परंतु पीएसएलव्ही-सी61 आणि पीएसएलव्ही-सी62 दोन्ही प्रकरणांमध्ये हा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
पीएमओला अहवाल : 18 मे (पीएसएलव्ही-सी61) च्या दुर्घटनेचा एफएसी अहवाल पीएसएलव्ही-सी62 च्या प्रक्षेपणापूर्वी पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आला होता, परंतु याचा तपशील गुप्त ठेवण्यात आला आहे. इस्रोमध्ये विश्लेषण करण्याची पूर्ण विशेषता आहे, परंतु यावेळी जनता आणि संबंधित घटकांचा विश्वास कायम ठेण्यासाठी त्रयस्थ मूल्यांकन केले जात असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.
पुढील लक्ष्य : इस्रो समस्येला पूर्णपणे दूर केल्यावर जून महिन्यात स्वत:च्या पुढील प्रक्षेपणाची महत्त्वाकांक्षी योजना आखत आहे.
आगामी मिशन : चालू वर्षात 18 प्रक्षेपणे निर्धारित असून यातील 6 मध्ये खासगी क्षेत्राचे उपग्रह सामील आहेत.
विदेशी प्रक्षेपण : पुढील वर्षी जपान, अमेरिका आणि फ्रान्सचे 3 मोठे विदेशी उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहेत.
कुठलाही देश किंवा कंपनीने स्वत:च्या प्रक्षेपण विनंतीला मागे घेतलेले नाही, यातून जगभरात इस्रोची विश्वसनीयता आणि त्याच्यावरील विश्वास अद्याप पूर्णपणे कायम असल्याचे स्पष्ट होते असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. 1993 पासून पीएसएलव्हीचा यशाचा दर 90 टक्क्यांपेक्षा अधिक राहिला आहे आणि याने जवळपास 350 उपग्रहांना यशस्वीपणे निश्चित कक्षेत स्थापित केले आहे.
Comments are closed.