टी 20 वर्ल्ड कपमध्ये शाहीन आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड, मात्र इंग्लंडविरुद्ध ठरला व्यर्थ

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड हा आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चा सुपर-८चा सामना मंगळवारी (२४ फेब्रुवारी) खेळला गेला. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, कॅंडीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंड जिंकला. त्यांनी शेवटच्या षटकात २ विकेट्स शिल्लक राखत सामना जिंकला. पाकिस्तानने हा सामना गमावला असला तरी त्यांचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने आणखी एक विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शाहीन पुन्हा एकदा लयीत दिसला. त्याने सामन्याच्या सुरूवातीलाच पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची कामगिरी केली. बघता-बघता पॉवरप्लेमध्ये इंग्लंडची वरची फळी उध्वस्त करण्यास सुरूवात केली. यावेळी इंग्लंड १६५ धावसंख्येचा पाठलाग करत होता. मागच्या सामन्यात बाकावर बसलेल्या शाहीनने या सामन्यात पाकिस्तानला जिंकून देण्याच्या आशा निर्माण केल्या.

दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहचण्याच्या प्रयत्नात असताना शाहीनने पॉवरप्लेमध्ये इंग्लंडचा खेळ बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्याने पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टला बाद केले. आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आधीच त्याच्या नावावर आहे, आता त्याने आणखी विकेट्स घेत त्यात भर टाकली आहे. आता तो टी२० विश्वचषकाच्या पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

या सामन्यात शाहीनने दुसऱ्या षटकातही विकेट घेतली. त्याने षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर जोस बटलरला बाद केले. तसेच सामन्यातील त्याच्या तिसऱ्या षटकातही त्याने विकेट घेण्याची कामगिरी केली. यावेळी त्याने सामन्याचे ५ वे षटक टाकले आणि पाचव्याच चेंडूवर जेकब बेथेलची विकेट घेतली. यामुळे तो पॉवरप्लेच्या तीन षटकात तीन विकेट्स घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याने त्या ३ षटकात १३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

त्याचबरोबर शाहीनने टी२० विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीतही पहिले स्थान गाठले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा दुसऱ्या स्थानावर गेला आहे.

टी२० विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स :
१८ – शाहीन आफ्रिदी (इकॉनॉमी रेट – ६.२२)*
१६ – कागिसो रबाडा (इकॉनॉमी रेट – ७.३०)
१५ – अँजेलो मॅथ्यूज (इकॉनॉमी रेट – ५.६५)

Comments are closed.