रेबीजच्या लससाठी अधिकाऱ्याची वणवण, डहाणू रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कुत्रा चावलेल्या एका महसूल अधिकाऱ्याला डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात व वाणगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजची लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या अधिकाऱ्याला वणवण करावी लागली. डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला असून तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी आमच्याकडे इंजेक्शन नसल्याने मुंबई किंवा गुजरातला जा, असा सल्ला दिला. यानिमित्ताने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा संतापजनक कारभार चव्हाट्यावर आला आहे.

पालघर जिल्हााच्या वाणगावमध्ये राहणाऱ्या महसूल अधिकाऱ्याचा त्याच्या घराजवळच भटक्या कुत्र्याने चावा घेतला. अधिकाऱ्याने लगेच स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. पण तेथे रेबीजची लस उपलब्ध नव्हती. त्यानंतर तो अधिकारी डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात गेला. पण तेथेही इंजेक्शन नसल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी आमच्याकडे रेबीज लसचा साठा नसल्यामुळे तुम्ही मुंबई किंवा गुजरातमध्ये जाऊन उपचार घ्या, असा अजब सल्ला दिला. त्यामुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्याला प्रचंड मनस्ताप झाला. या अधिकाऱ्याला अखेर कासा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजची लस उपलब्ध झाली.

लाखो रुपये जातात कुठे? ग्रामीण भागासह उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयातही औषधे व इंजेक्शन्स २४ तास तयार ठेवावी लागतात. याकरिता लाखो रुपये आरोग्य विभाग खर्च करते. तरीही ही औषधे वेळेवर का मिळत नाहीत, लाखो रुपये जातात कुठे, असा थेट सवाल पालघरमधील नागरिकांनी केला आहे.

Comments are closed.