नागपूरच्या दिलीप वरकड यांची विश्वविक्रमी भरारी -‘वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकर’ सन्मानाने गौरव

नागपूरचे ज्येष्ठ अल्ट्रासायकलिस्ट आणि समाजसेवक दिलीप वरकड यांनी वयाच्या ६१व्या वर्षी जागतिक स्तरावर विक्रमी कामगिरी करत नागपूरचा मान उंचावला आहे. शनिवारी (२१ फेब्रुवारी) नवी दिल्ली येथे झालेल्या ‘वर्ल्ड अचीवर्स अवॉर्ड २०२६’ समारंभात त्यांना “वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकर” या विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. या कार्यक्रमास माजी भारतीय क्रिकेटपटू व बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा तसेच एरिट्रिया (पूर्व आफ्रिका) देशाचे राजदूत एच. ई. आलेम टी. वोल्डेमारियम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
वरकड यांनी काश्मीर ते कन्याकुमारी अशी तब्बल ३ हजार ७५८ किलोमीटरची ‘इंडियन ऑइल रेस अक्रॉस इंडिया’ ही अधिकृत अल्ट्रासायकलिंग शर्यत १२ दिवस ११ तास १४ मिनिटांत पूर्ण करून ज्येष्ठ नागरिक गटात नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. ही शर्यत वर्ल्ड अल्ट्रासायकलिंग असोसिएशनद्वारे अधिकृत असून त्यांच्या या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. तसेच जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या ‘रेस अक्रॉस अमेरिका’ स्पर्धेसाठी त्यांना नामांकन मिळाले आहे.
निवृत्त आयटी व्यावसायिक असलेले दिलीप वरकड हे नागपूरच्या टायगर सिटी सायकलिंग असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी सायकलिंग प्रसाराचा ध्यास घेतला आहे. विश्वविक्रमवीर अल्ट्रासायकलिस्ट डॉ. अमित समर्थ यांचे मार्गदर्शन, कुटुंबीय व मित्रपरिवाराचे सहकार्य आणि समर्थकांचा विश्वास हेच आपल्या यशामागचे बळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही नव्या उंची गाठणाऱ्या त्यांच्या या प्रवासाने “वय हा केवळ आकडा आहे” हा संदेश पुन्हा अधोरेखित केला आहे.
Comments are closed.