इराण हादरले! सर्वोच्च नेते अली खोमेनी यांच्या निवासस्थानावर २५० MEK दहशतवाद्यांचा हल्ला
इराणची राजधानी तेहरानमध्ये आज मोठी हिंसक घटना घडली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या अधिकृत निवासस्थानावर सुमारे २५० दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. हे सर्व दहशतवादी प्रतिबंधित संघटना मुजाहिद्दीन-ए-खल्कशी (MEK) संबंधित असल्याचे सांगितले जात असून, या हल्ल्यामुळे इराणमधील सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमईके (MEK) या संघटनेच्या सुमारे २५० दहशतवाद्यांनी अचानक खोमेनी यांच्या निवासस्थानाच्या दिशेने कूच केले. या दहशतवाद्यांनी सुरक्षा कडे तोडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तेथील सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये जोरदार चकमक झाली. हा हल्ला इतका नियोजित होता की, सुरक्षा रक्षकांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
खोमेनी यांच्या निवासस्थानाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही बाजूंनी मोठा संघर्ष झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात गोळीबाराचे आणि गोंधळाचे आवाज ऐकू आले. या संघर्षामध्ये काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र इराण सरकारने अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
काय आहे MEK संघटना?
मुजाहिद्दीन-ए-खल्क (MEK) ही इराणमधील एक निर्वासित आणि प्रतिबंधित संघटना आहे, जी सध्याच्या इराण सरकारला हटवण्याचा प्रयत्न करत आहे. या संघटनेने यापूर्वीही अनेकदा इराणमधील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. खामेनी यांच्यासारख्या अतिसुरक्षित व्यक्तीच्या घरावर झालेला हा हल्ला इराणच्या अंतर्गत सुरक्षेतील मोठी चूक मानली जात आहे.
Comments are closed.