कर्नाटकची गोलंदाजी ठरली अपयशी; जम्मू-काश्मीरची भक्कम वाटचाल

रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या अंतिम सामन्यात जम्मू आणि काश्मीरच्या संघाने आतापर्यंत फलंदाजीच्या जोरावर कर्नाटकला अडचणीत आणले आहे. याच कारणामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जम्मू आणि काश्मीरचा संघ सामन्यात आघाडीवर आहे. कर्नाटकच्या गोलंदाजांनी दोन्ही दिवस चांगली कामगिरी केलेली नाही, ज्यामुळे ते सामन्यात खूप पिछाडीवर पडले आहेत. आता अंतिम सामन्यातील तिसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

​पहिल्या दिवशी शतक झळकावून खेळत असलेला शुभम पुंडीर दुसऱ्या दिवशी केवळ ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, त्याच्या १२१ धावांच्या खेळीमुळे काश्मीरला सामन्यात भक्कम स्थिती मिळाली. पहिल्या दिवशी ‘रिटायर्ड हर्ट’ झालेला कर्णधार पारस डोगरा दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला आणि ७० धावा करून बाद झाला. अब्दुल समद सुद्धा आज ६१ धावांवर बाद झाला; त्याने आपल्या कालच्या धावसंख्येत आज केवळ ९ धावांची भर घातली. कन्हैया वधावनने देखील दुसऱ्या दिवशी ७० धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा जम्मू आणि काश्मीर संघाने ६ गड्यांच्या बदल्यात ५२७ धावा केल्या आहेत. साहिल लोटरा ५७ धावांवर, तर आबिद मुश्ताक २० धावांवर नाबाद खेळत आहेत. कर्नाटकसाठी कृष्णाने दुसऱ्या दिवशी १ बळी घेतला, तर इतर गोलंदाजांनी मात्र खूप निराशा केली.

​अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या जम्मू आणि काश्मीरची सुरुवात चांगली झाली नव्हती. सलामीवीर यावर हसनने ८८ धावांची अत्यंत महत्त्वाची खेळी खेळली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुभम पुंडीरने पहिल्या दिवशी नाबाद ११७ धावा केल्या होत्या. कर्णधार पारस डोगरा दुखापतीमुळे ९ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला होता, तर अब्दुल समदने पहिल्या दिवशी ५२ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जम्मू आणि काश्मीरने २ गड्यांच्या बदल्यात २८४ धावा केल्या होत्या. कर्नाटकसाठी तोपर्यंत प्रसिद्ध कृष्णानेच २ बळी घेतले होते.

Comments are closed.