विधानसभेत लोहारडोंगरी खाणीचा मुद्दा गाजला, 32 नोकऱ्यांसाठी लाखो झाडांची कत्तल
चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी इथे प्रस्तावित लोह खाणीचा विषय आज विधानसभेत चर्चेला आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार नितीन राऊत, आमदार असलम शेख यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. केवळ 32 नोकऱ्यांसाठी लाखो झाडांची कत्तल होणार असेल आणि वाघांचा मार्ग बंद केला जात असेल, तर अशा प्रकल्पाची गरज काय, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लोहारडोंगरी या आदिवासीबहुल गावाजवळ किर्र जंगलात लोह खनिजाचा साठा आहे. त्याचे उत्खनन करण्यासाठी शासनाने राज्य वन्यजीव अभ्यास मंडळाकडे हा विषय सोपवला. या मंडळाने शासनाच्या बाजूने कल दिला आणि त्यानंतर तो केंद्राच्या राष्ट्रीय वन्यजीव प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला. या खाणीला पर्यावरणवाद्यांचा सुरुवातीपासून विरोध आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि इतर जंगल क्षेत्रांना जोडणारा मार्ग याच खाण पट्ट्यातून जातो. वर्गासाठी महत्वाचा असा हा कॉरिडॉर आहे. शिवाय वनसंपदा विपुल आहे. त्यामुळे इथे खाण झाल्यास जंगल आणि वन्यजीवांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती असल्याने पर्यावरणवादी या प्रकल्पास विरोध करीत आहेत. या प्रकरणी नागपूर खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.
विधानसभेत याच विषयावर राऊत आणि ठाकरे बोलले. पण हे प्रकरण राष्ट्रीय वन्यजीव प्राधिकरणाकडे आणि न्यायालयात असल्याने शासन त्याची प्रतीक्षा करेल, असे उत्तर वनमंत्र्यांनी दिले. यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी मंत्र्यांचे कान टोचले. एखादी बाब न्यायप्रविष्ट आहे, म्हणून आपण निर्णय घ्यायचा नाही असे अध्यक्ष म्हणाले.
Comments are closed.