मागवून खाल्लं आणि पोट बिघडलं! किवी कर्णधार सँटनरने शेअर केला त्याचा अनुभव

‘भूक लागली होती, मी एका अ‍ॅपच्या माध्यमातून मागवलं. ते आलं. मी खाल्लं आणि माझं पोटच बिघडलं’, असं न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने सांगितलं. सँटनर वर्ल्डकप मोहिमेदरम्यान कॅनडाविरुद्धचा सामना खेळू शकला नाही. त्याचं कारण त्याने उलगडलं.

काही वर्षांपूर्वी विदेशी खेळाडूंना भारत दौऱ्यात इथल्या खाद्यपदार्थांचा सामना करणं कठीण जायचं. मात्र आता अनेक संघ स्वतंत्र पोषणआहारतज्ज्ञ आणतात. अनेक संघ त्यांना हवे तसे जेवण मिळावं यासाठी शेफलाच घेऊन येतात. भारतातल्या पंचतारांकित हॉटेलांमध्येही आता जगभरातील सगळे पदार्थ मिळू लागले आहेत.

भारतात खेळताना फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या, प्रचंड उकाडा, भारतीय चाहते या सगळ्याच्या बरोबरीने मसालेदार पदार्थांचा सामना करणं विदेशी खेळाडूंना कठीण जात असे. आयपीएलनंतर ही काठिण्यपातळी कमी झाली. तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोट बिघडलं असे सांगणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी झाली.

श्रीलंकेविरुद्धच्या लढतीपूर्वी सँटनरला कॅनडाविरुद्धच्या लढतीतील अनुपस्थितीविषयी विचारण्यात आलं. त्यावर हसत हसत सँटनरने उत्तर दिलं. तो म्हणाला, मी फूड अ‍ॅपच्या माध्यमातून ऑर्डर केलं आणि खाल्लं. त्यानंतर मी पुन्हा मागवून खाल्लं नाही. आता माझी तब्येत नीट आहे.

कॅनडाविरुद्ध सँटनरऐवजी डॅरेल मिचेलने संघाचं नेतृत्व केलं होतं. सँटनर का खेळत नाहीये? यावर मिचेल म्हणाला होता, ‘सँटनरने आदल्या दिवशी बर्गर खाल्ला. तो त्याला महागात पडला. त्याचं पोट बिघडलं आहे. पुढच्या लढतीत तो खेळू शकेल’.

Comments are closed.