इस्रायली संसदेत मोदींनी केला हमासचा निषेध, आणखी एक गळाभेट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इस्रायल दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायली संसद अर्थात नेसेटला संबोधित केले. मोदींनी यावेळी हमासने इस्रायलमध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा स्पष्ट शब्दांत निषेध केला. ‘दहशतवादाचे आणि निष्पाप नागरिकांच्या हत्येचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही,’ असे मोदींनी स्पष्ट केले.

‘समाजात दुफळी माजवण्यासाठी, विकास रोखण्यासाठी दहशतवादाचा आश्रय घेतला जातो. दहशतवाद मोडून काढण्यासाठी एकत्रित व सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळेच शांतता आणि स्थैर्यासाठी हिंदुस्थानने नेहमीच पाठिंबा दिला आहे. हिंदुस्थान प्रदीर्घ काळापासून दहशतवादाच्या वेदना सहन करत आला आहे. त्यामुळे इस्रालयचे दुःख आम्ही समजू शकतो,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांना यावेळी इस्रायलच्या ‘स्पीकर ऑफ द नेसेट मेडल’ या सर्वोच्च संसदीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
माझा जन्म झाला तेव्हा…

मोदींनी यावेळी इस्रायलशी असलेल्या वेगळय़ा नात्याचीही माहिती दिली. ‘हिंदुस्थानने 17 सप्टेंबर 1950 रोजी इस्रायलला अधिकृत मान्यता दिली त्याच दिवशी माझा जन्म झाला होता,’ अशी आठवण त्यांनी सांगितली.

मोदी सुमडीत सटकले; राहुल गांधींची टीका

इस्रायल दौऱयावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. ‘नरेंद्र सरेंडर मोदी यांना मी हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करार रद्द करण्याचे आव्हान दिले होते, पण ते गुपचूप इस्रायलला सटकले. याआधी त्यांनी एपस्टीनच्या सांगण्यावरून इस्रायलमध्ये नाचगाणे केले होते. यावेळी कोणाच्या सांगण्यावरून देशहिताचा सौदा करणार आहेत,’ असा खोचक सवाल राहुल यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे केला.

Comments are closed.