लोकलमध्ये महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही, पुश टू टॉक बटण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई लोकलमधील महिलांसाठी राखीव डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुश टू टॉक बटण उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक स्थानकावर पोलीस अंमलदार, एमएसएफ व होमगार्ड यांची प्लॅटफॉर्मवर ड्युटी नेमली आहे. महिलांच्या डब्याजवळ, प्लॅटफॉर्मवर व स्टेशन परिसरात आवश्यकतेनुसार बंदोबस्त ठेवण्यात येतो तसेच रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत महिलांच्या प्रत्येक डब्यात गणवेशधारी सुरक्षा कर्मचारी तैनात ठेवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबई लोकलमधील महिलांच्या डब्यात चढलेल्या एका 50 वर्षीय व्यक्तीला महिलांनी हटकल्याने त्या व्यक्तीने 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला पनवेल ते खांदेश्वर स्थानकांदरम्यान चालत्या ट्रेनमधून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यामुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या लाखो महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने काय उपाययोजना केल्या, असा तारांकित प्रश्न सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत विचारला होता. त्यावर दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, खाकीतली सखी

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र महिला सुरक्षा पथक आहेत. बडी कॉप संकल्पनेअंतर्गत महिला प्रवाशांशी थेट संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला असून त्यात 18 हजार महिला जोडल्या आहेत. ‘खाकीतली सखी’ अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थिनींमध्ये पथनाट्य, रॅली याद्वारे जनजागृती केली जात आहे तसेच मुंबई व उपनगरातील रेल्वे स्थानकांवर 397 सीसीटीव्ही आणि 5904 कॅमेरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली.

Comments are closed.