मोठी बातमी: मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात FIR वरुन राड्यानंतर रोहित पवारांना CMO मधून फोन गेला, ने
रोहित पवार: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमागे घातपात असल्याचा आरोप करणारे आणि या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मुख्यमंत्री कार्यालयाने फोन केल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवार हे बुधवारी अजित पवार विमान अपघातप्रकरणात (Ajit Pawar Plane Crash) नागरी उड्डाण संचलनालयाविरोधात (डीजीसीए) तक्रार दाखल करण्यासाठी मुंबईच्या मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, याठिकाणी पोलिसांनी त्यांची FIR स्वीकारण्यास नकार दिला होता. यावरुन रोहित पवार आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाचीही झाली होती. या सगळ्या घटनेनंतर मुख्यमंत्री कार्यालयातून रोहित पवार यांना फोन गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा फोन वेगळ्या कारणासाठी करण्यात असल्याचे समजते. (Maharashtra Poliitcs news)
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने हा फोन आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रोहित पवार यांच्याकडून बारामती येथे आणि मुंबईत देवगिरी या शासकीय निवासस्थानी अजित पवार यांचे स्मारक (Ajit Pawar Memorial) करण्याची मागणी करण्यात आली होती. या स्मारकाच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात तरतूद करण्याबाबतच्या चर्चेसाठी फोन आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यावर रोहित पवार काय म्हणाले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
दरम्यान, रोहित पवार हे आज अजित पवार अपघातप्रकरणी डीजीसीएविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी बारामती (Baramati news) तालुका पोलीस ठाण्यात येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राजेंद्र पवार आणि युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हेदेखील असतील. सध्या बारामती पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. काल मुंबई पोलिसांनी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात FIR दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता बारामती पोलीस याप्रकरणात तक्रार नोंदवून घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकीकडे रोहित पवार बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी येत असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.