T20 WC: सॅंटनर-मॅककोन्चीमुळे ऑस्ट्रेलियाचा 16 वर्षांचा विक्रम उद्ध्वस्त! मिचेलने केले अनेक रेकॉर्ड्स

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅंटनरने पुन्हा एकदा आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी केली आहे. याबरोबरच त्याने मोठा विक्रमही नोंदवला आहे. आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत न्यूझीलंडचा दुसरा सुपर-८चा सामना बुधवारी (२६ फेब्रुवारी) खेळला गेला. यामध्ये त्यांची स्थिती एकेकाळी ८४ धावांवर ६ विकेट्स अशी होती. त्यात सॅंटनरने कोल मॅककोन्चीसोबत सातव्या विकेटसाठी मोठी भागीदारी केली आणि अनेक विक्रमे मोडली.

आर प्रेमदासा, कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दसून शनाकाचा हा निर्णय योग्य ठरल्याचे जाणावले, कारण न्यूझीलंडने १२.१ षटकातच ८४ धावसंख्येवर ६ विकेट्स गमावल्या. असा परिस्थितीत सॅंटनरने मॅककोन्चीसोबत ४७ चेंडूत ८४ धावांची भागीदारी केली. ज्यामुळे न्यूझीलंडने २० षटकात ७ विकेट्स गमावत १६८ धावासंख्या उभारली.

सॅंटनर-मॅककोन्चीमध्ये झालेल्या भागीदारीमुळे न्यूझीलंडच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला आहे. याआधी हा विक्रम २४ धावांचा होता, जो सॅंटनर आणि ईश सोधी यांनी केला होता. त्याचबरोबर ही पुरुषांच्या टी२० विश्वचषकातील सातव्या किंवा त्यापेक्षा खालील विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. २०१०मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मायकल हसी आणि स्टीव्ह स्मिथ यांनी सातव्या विकेटसाठी बांग्लादेशविरुद्ध ७४ धावांची भागीदारी केली होती.

सॅंटनरने श्रीलंकेविरुद्ध २६ चेंडूत ४७ धावा केल्या. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १००० धावाही पूर्ण केल्या. या डावातील २६वी धाव घेताच त्याने हा विक्रम केला. त्याने आता १३२ सामन्यांच्या ८८ डावांमध्ये १०२१ धावा केल्या आहेत. तसेच तो न्यूझीलंडकडून टी२०मध्ये १००० पेक्षा अधिक धावा करणारा १३वा खेळाडू ठरला आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर मोठ्या भागीदाऱ्या झाल्याच नाही. कामिंडू मेंडिसने सर्वाधिक अशा ३१ धावा केल्या. बाकी फलंदाजांनी निराशा केल्याने श्रीलंका २० षटकात ८ विकेट्स गमावत १०७ धावाच करू शकला. त्यामुळे हा सामना यजमान श्रीलंकेने ६१ धावांनी गमावला आणि ते या स्पर्धेतून बाहेर झाले.

Comments are closed.