BMC Budget 2026 – राज्य सरकारने शिक्षण विभागाचे सात हजार कोटी लवकरात लवकर द्यावे, अंकित प्रभू यांची मागणी
मुंबई महापालिकेच्या ठेवींवर डल्ला मारण्याचा भाजपचा डाव बुधवारी अर्थसंकल्पातून उघडकीस आला. त्यावरुन शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्ताधारी भाजपला घेरले असतानाच आता पालिका शिक्षण विभागाच्या थकबाकीचा मुद्दा समोर आला आहे. महापालिका शिक्षण विभागाचे सात हजार कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत आहेत. सरकारने ही कोट्यवधीची थकबाकी पालिका शिक्षण विभागाला लवकरात लवकर द्यावी, अशी आग्रही मागणी शिवसेना नगरसेवक (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि पालिकेतील शिक्षण समिती सदस्य अंकित प्रभू यांनी केली आहे. अर्थसंकल्पातील शैक्षणिक तरतुदी तसेच त्रुटींवर बोट ठेवत अंकित प्रभू यांनी ही मागणी केली आहे.
मुंबई महापालिकेचा 2026-27 आर्थिक वर्षाचा 80,952.56 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे समितीच्या बैठकीत अर्थसंकल्प सादर केला. त्यावर शिवसेना नगरसेवक (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंकित प्रभू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारकडे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे सात हजार कोटी थकीत आहे. राज्यात सत्ता तुमची आहे, मुंबई महापालिकेत सत्ता तुमची आहे, प्रशासन तुमचं आहे. तेव्हा तुम्ही विरोधी पक्ष होता आता सत्ता तुमची आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे पैसे महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करा, अशी मागणी अंकित प्रभू यांनी केली. थकीत निधीबाबत महापालिकेत आम्ही मुद्दा उचलणारच आहोत. शिवसेनेचे आमदार विधानसभेतही हा मुद्दा उचलून धरतील. मुंबई महापालिकेच्या हक्काचा पैसा आहे. महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या निधीचा फायदा होणार आहे. त्यामुळेच थकीत रक्कम लवकरात लवकर राज्य सरकारकडून मुंबई महापालिकेकडे देण्यात यावी, यासाठी आम्ही लढत राहू, असे अंकित प्रभूंनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्पातील विविध त्रुटींवर अंकित प्रभू यांनी बोट ठेवले आहे. दहावीनंतर पुढे काय? याबाबत मार्गदर्शन, शालेय विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टचची माहिती, मुलींना बेसिक सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण अशी शिबिरं महापालिका शाळेत घेतली पाहिजेत. अशा अनेक संकल्पना या बजेटमध्ये नाहीत. याची तरतूद या बजेटमध्ये असायला पाहिजे, अशी मागणी आम्ही शिक्षण समिती अध्यक्षांकडे करणार आहोत. शिक्षण समितीचे सदस्य म्हणून पुढील बैठकीत आम्ही विविध त्रुटींबाबत आमचे विचार मांडू, असेही अंकित प्रभू यांनी नमूद केले.
Comments are closed.