INDvsZIM: अतिमहत्वाच्या सामन्यासाठी कशी असेल चेपॉकची खेळपट्टी? वाचा पिच रिपोर्ट सविस्तर

करो वा मरो स्थिती असलेल्या सामन्यात भारत-झिम्बाब्वे एकमेकांना भिडणार आहेत. आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये गतविजेता आणि यजमान भारताची चिंता वाढली आहे. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकत धमाक्यात सुपर-८मध्ये पोहोचणाऱ्या भारताला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. याचा मोठा धक्का संघाच्या सेमीफायनलमध्ये पोहोण्याच्या आशेला लागला आहे. यामुळे आज (२६ फेब्रुवारी) चेन्नईमध्ये खेळल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताला मोठा विजय मिळवावा लागणार आहे. यासाठी एमए चिंदबरम स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल, हे जाणून घेऊ.

पारंपरिकपणे चेन्नईची खेळपट्टी स्पिनसाठी उत्तम होती, मात्र या स्पर्धेसाठी ती बदलण्यात आल्याने त्याला आता वेगळेपण आले आहे. ही खेळपट्टी आता फलंदाजांना अधिक अनुकूल झाली आहे. यामुळे चाहत्यांना मोठ्या धावसंख्येचा सामना पाहण्यास मिळेल. या स्पर्धेच्या साखळी फेरीतील दोन सामने जे सायंकाळी खेळले गेले, ज्यामध्ये १८० धावसंख्येपेक्षा अधिक लक्ष्य मिळाले होते आणि जे आधीच्या खेळपट्टीवर करण्यास अवघड जात होते.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना सेंट्रल पिचवर (क्रमांक ५) खेळला जाणार आहे. तेव्हा सीमारेषा दोन्ही बाजूंनी समान आहे. तसेच ही खेळपट्टी काळ्या मातीची असणार आहे. चेन्नईची खेळपट्टी बदलण्यात आल्याने त्यावर स्पिनर्सची सरासरी अत्यंत वाईट ठरली आहे. या स्पर्धेत ज्या आठ ठिकाणी सामने खेळले गेले त्यापैकी स्पिनर्ससाठी वाईट ठरलेली ही दुसऱ्या क्रमांकांची खेळपट्टी आहे.

या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना आजचा विजय महत्वाचा आहे. हा सामना सांयकाळी ७ वाजता खेळला जाणार आहे. यासाठी भारतीय संघाच्या अंतिम अकरामध्ये बदल दिसण्याची शक्यता आहे. मागच्या सामन्यात बाकावर बसलेला अक्षर पटेल या सामन्यात खेळू शकतो.

तसेच भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा फॉर्ममध्ये नसल्याने त्यातही बदल दिसू शकतो. अशा स्थितीत संजू सॅमसनला प्रवेश मिळण्याची शक्यता आहे, कारण तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. या स्पर्धेत भारताने एक सामना वगळता बाकी सर्व सामन्यांमध्ये डावखुरे फलंदाज सलामीला आले होते. त्या सर्व सामन्यात भारताने पहिल्याच षटकात विकेट्स गमावल्या होत्या. संजूच्या येण्याने राईट-लेफ्ट कॉम्बिनेशन संघाला फायद्याचे ठरेल.

Comments are closed.