12 चेंडूत 59 धावा देत या वेगवान गोलंदाजाने वाढवली संघाची चिंता, एका षटकात दिल्या तब्बल 36 धावा

IPL 2026 सुरू होण्यासाठी आता महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. सर्व संघांनी अंतिम तयारीला वेग दिला असताना कोलकाता नाइट राइडर्सच्या गोठ्यात मात्र चिंतेचे सावट पसरले आहे. संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या खराब फॉर्ममध्ये असून त्याची अलीकडील कामगिरी निराशाजनक ठरली आहे.
उमरान मलिक सध्या डीवाय पाटील टी-२० स्पर्धेत टाटा स्पोर्ट्स क्लबकडून खेळत आहे. मुंबई कस्टम्सविरुद्धच्या सामन्यात त्याची गोलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. त्याने केवळ दोन षटकांत तब्बल 59 धावा खर्च केल्या.
डावाच्या दुसऱ्या षटकात त्याने 23 धावा दिल्या. या षटकात तीन षटकार आणि एक चौकार लगावण्यात आला. त्यानंतर 13व्या षटकात त्याला पुन्हा चेंडू देण्यात आला. हे षटक 10 चेंडूंचे ठरले. तीन नो-बॉल आणि एक वाईड टाकत त्याने 36 धावा दिल्या. फलंदाजांनी तीन षटकार, तीन चौकार आणि दोन धावा पळून काढल्या. या स्पेलनंतर उमरानच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उमरान मलिक भारतीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जलद चेंडू टाकणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये त्याची नोंद आहे. आयपीएलमधील सर्वात जलद भारतीय चेंडूचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. मात्र त्याच्या लाईन-लेंथमधील सातत्याचा अभाव त्याच्यासाठी अडचणीचा ठरत आहे.
तो जुलै 2023 पासून भारतीय संघाबाहेर आहे. मागील दोन आयपीएल हंगामांत त्याला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती.
आयपीएल 2026 पूर्वी केकेआरला सलग धक्के बसले आहेत. वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान बंदीमुळे हंगामातून बाहेर आहे. तर हर्षित राणा दुखापतीमुळे मैदानापासून दूर आहे. याशिवाय श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना यालाही दुखापत झाली आहे.
अशा परिस्थितीत उमरान मलिककडून मोठ्या अपेक्षा असताना त्याची ही कामगिरी केकेआरसाठी चिंतेची बाठरत आहे. आयपीएल 2026 पूर्वी त्याने लय सापडवणे संघासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.