Ranji Trophy Final: 4 षटकात 4 धावा अन् केएल राहुलची विकेट! आकिब नबीची भन्नाट बॉलिंग

रणजी ट्रॉफी २०२५-२६चा अंतिम सामना कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर असा हुबळीमध्ये सुरू आहे. या सामन्यात जम्मू-काश्मीरने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही कमालीची कामगिरी केली आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज आकिब नबीने तर कमाल केली आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत १२ आणि उपांत्य फेरीत ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच कामगिरीत सातत्य राखत कर्नाटकच्या फलंदाजांना त्रास दिला आहे. त्याने त्यांचा सलामीवीर केएल राहुललाही बाद केले आहे. यामध्ये विशेष म्हणजे राहुलने मागील दोन सामन्यात दोन शतके आणि एक अर्धशतक केले आहे. यावरून त्याची विकेट किती महत्वाची होती, याचा अंदाज येतो.

आकिबने त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये दुसऱ्याच चेंडूवर राहुलची विकेट घेतली. राहुल आलेला चेंडू डिफेंस करण्याच्या प्रयत्नात असताना तो बॅटच्या कडला लागला आणि विकेटकीपरने तो चेंडू उत्तमरित्या झेलला. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले, मात्र पंच मानले नाही. यामुळे जम्मू-काश्मीरने डीआरएस घेतला आणि राहुल बाद झाला.
राहुल आकिबविरुद्ध संघर्ष करताना दिसला.

आकिबने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये राहुल आणि मयंक अग्रवाल यांना अधिक धावा करू दिल्या नाही. त्याने त्या चार षटकातील दोन षटके निर्धाव टाकली आणि केवळ ४ धावा दिल्या. यावेळी त्याने सतत इनस्विंग आणि आऊट स्विंगचा वापर करत फलंदाजांवर नियंत्रण ठेवले. राहुलने ३९ चेंडूत १३ धावा केल्या. यामधील २२ चेंडू नबीने टाकले आणि त्यावर केवळ ३ धावा केल्या होत्या.

या सामन्यात जम्मू-काश्मीरचा कर्णधार पारस डोग्राने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पहिल्या डावात त्यांनी १० विकेट्स गमावत ५८४ धावसंख्या उभारली. त्यात शुभम पुंडीरने १२१ धावा केल्या.
कर्नाटकचा पहिला डाव सुरू असून आतापर्यंत नबीची जबरदस्त कामगिरी राहिली आहे. त्याने १२ षटकात ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या आहेत.

Comments are closed.