दक्षिण आफ्रिकेने वेस्ट विंडिजचा फडशा पाडला! Point Table मध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची चांदी

दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा सुपर-8 टी20 विश्वचषक 2026 चा पराभव केला: आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये आता कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. गुरुवारी अहमदाबादच्या ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या 47 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाने गुणतालिकेत मोठी उलथापालथ केली असून, या निकालामुळे भारतीय संघासाठी देखील उपांत्य फेरीची (Semi-Final) दारे उघडली गेली आहेत. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने 4 गुणांची कमाई करत पॉइंट्स टेबलमध्ये थेट अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

वेस्ट इंडिजची टॉप ऑर्डर स्वस्तात तंबुत…

या सामन्यात वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंग आणि शाई होप डावाची सुरुवात करण्यासाठी आले. त्यांनी 2.2 षटकांत पहिल्या विकेटसाठी 29 धावा चोपल्या. संघाला पहिला धक्का कर्णधार शाई होपच्या (16 धावा) रूपात बसला. होपनंतर हेटमायर (2 धावा),  किंग (21 धावा), रोव्हमन पॉवेल (9), रोस्टन चेस (2), शेरफेन रुदरफोर्ड (12) आणि मॅथ्यू फोर्ड (11) देखील बाद झाले. 83 धावांत 7 विकेट गमावल्यानंतर, रोमारियो शेफर्ड आणि जेसन होल्डर यांनी वेस्ट इंडिज संघाची धुरा हाती घेतली.

जेसन होल्डर अन् रोमारियो शेफर्डचा तांडव…

वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने 31 चेंडूत 49 धावा केल्या. रोमारियो शेफर्डने 37 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने तीन, तर कॉर्बिन बॉश आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

एडेन मार्कराम आणि क्विंटन डेकॉकने विंडिजच्या गोलंदाजांना धू धू धुतलं…

177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख मिलाफ साधला. एडेन मार्कराम आणि क्विंटन डेकॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भक्कम भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. डिकॉकने अवघ्या 24 चेंडूमध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांच्या जोरावर 47 धावांची स्फोटक खेळी केली. मात्र रोस्टन चेज याने डिकॉकला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर एडेन मार्कराम आपलं अर्धशतक पुर्ण केले.

अवघ्या एका विकेटच्या मोबदल्यात त्यांनी हे लक्ष्य गाठत 9 विकेट्सने सामना खिशात घातला. विंडिजचा पराभव आणि आफ्रिकेची आगेकूच यामुळे आता स्पर्धेतील रंगत वाढली असून, भारताच्या सेमीफायनल प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतासाठी कसं खुलं झालं दार? (Team India Semifinal Scenarios)

दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग तुलनेने सोपा झाला आहे. आता समीकरण स्पष्ट आहे, भारताने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. आज भारताचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे. हा सामना जिंकल्यास संघाचा आत्मविश्वास दुणावेल आणि 1 मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध होणारा सामना ‘करो या मरो’ ठरेल. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या या गिफ्टचा भारत कितपत फायदा करून घेतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा –

331.58 चा स्ट्राइक रेट अन् वैभव सूर्यवंशीचा तांडव! फक्त 14 चेंडूत ठोकले अर्धशतक, अर्जुन तेंडुलकरचाही धुमाकूळ

आणखी वाचा

Comments are closed.