अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल यांच्याकडून घोषणा

अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य आणि देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली. “सामान्य कुटुंबातून आलेल्या अजित पवारांनी आपल्या कार्यातून राज्य आणि देशात वेगळी ओळख निर्माण केली. 2023 मध्ये ते  पक्षाचे अध्यक्ष झाले होते, हे सांगताना मला कोणतीही अडचण नाही,” असे म्हणत पटेल यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अजित पवार गटाच्या पक्ष बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रफुल पटेल यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत हा प्रस्ताव मांडला आणि सर्वानुमते त्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीत सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार, रुपाली चाकणकर, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पार्थ पवार यांच्याकडेही पक्षात महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

प्रफुल पटेल म्हणाले, “28 जानेवारी रोजी अजित दादा आपल्यातून निघून गेले, तो क्षण सर्वांसाठी धक्कादायक होता. पुढे काय करायचे, पक्षाची दिशा काय असणार, असा प्रश्न सर्वांसमोर होता. मात्र, सुनेत्राताईंच्या नेतृत्वात पक्ष सक्षमपणे पुढे जाईल.”

काही जण पक्षाशी संबंध नसतानाही विविध वक्तव्ये करत असल्याचा उल्लेख करत पटेल म्हणाले, “काही लोक पोटात एक आणि ओठात एक बोलत होते. मात्र, आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केले. आता अजित पवारांच्या आदर्शावर पुढे जाण्याची वेळ आली आहे.”

अजित पवारांनी मला राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नेमून मोठा विश्वास दाखवला होता, असे सांगत पटेल यांनी पक्ष महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी काम करत राहील, अशी ग्वाही दिली. “प्रदेश अध्यक्ष तटकरे, भुजबळ आणि मुश्रीफ यांच्यासह आमच्यावर पक्ष पुढे नेण्याची जबाबदारी होती. मी 35 वर्षांचा मित्र म्हणून आज सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडतो,” असे ते म्हणाले.

यानंतर उपस्थित सर्वांनी हात उंचावून प्रस्तावाला समर्थन दिले. अखेरीस, “सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे,” अशी अधिकृत घोषणा प्रफुल पटेल यांनी केली.

Comments are closed.