SA vs Wi : मारक्रमच्या फटकेबाजीने वेस्ट इंडिजचा धुव्वा! दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये, भारतालाही मोठा दिलासा

दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवला आहे (South Africa vs West Indies). कर्णधार एडन मारक्रमने (Aiden Markram) कॅरेबियन गोलंदाजांची जोरदार धुलाई करत 82 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले असून, हा विजय टीम इंडियासाठीही फायदेशीर ठरला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली. एका टप्प्यावर वेस्ट इंडिजची अवस्था 7 बाद 83 अशी बिकट झाली होती. मात्र, जेसन होल्डर (49 धावा) आणि रोमारियो शेफर्ड (52 धावा) यांनी 89 धावांची भागीदारी करून संघाला 176 धावांपर्यंत पोहोचवले.
177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना क्विंटन डिकॉक आणि एडन मारक्रमने दक्षिण आफ्रिकेला धडाकेबाज सुरुवात करून दिली. या जोडीने केवळ 8 ओव्हरमध्ये 95 धावा करत विंडीजच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले. डिकॉकने 24 चेंडूत 47 धावा केल्या, तर कर्णधार मारक्रमने 46 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 82 धावा ठोकल्या. रायन रिकल्टननेही 45 धावांचे मोलाचे योगदान दिले.
गोलंदाजीमध्ये लुंगी एन्गिडीने 3 विकेट्स घेऊन वेस्ट इंडिजची दाणादाण उडवली, तर कागिसो रबाडा आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे भारतीय संघाचा सेमीफायनलचा मार्ग सोपा झाला आहे. आता भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी फक्त आपले पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. विशेष म्हणजे, आज संध्याकाळी जर भारताने झिम्बाब्वेचा पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलमधील स्थान अधिकृतपणे पक्के होईल.
Comments are closed.