काहीही झाले तरी दोषींना मात्र सोडणार नाही, पूर्ण ताकदीनिशी हा लढा लढू – रोहित पवार
अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी राजकीय घडामोडींना वेग आला असून आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणातील सर्व माहिती आणि उपलब्ध पुरावे आज सीआयडीकडे सुपूर्द केल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) या सामाजिक माध्यमावर पोस्ट करत याबाबत भूमिका स्पष्ट केली.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्वर्गीय दादांच्या अपघाताशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक माहिती आणि उपलब्ध पुरावे त्यांनी अधिकृतपणे सीआयडीकडे दिले आहेत. अपघातासाठी जबाबदार असलेल्या व्हीएसआर कंपनीविरोधात तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) विरोधात एफआयआर दाखल करणे का आवश्यक आहे, याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे.
“आभाळाएवढी उंची असलेल्या नेत्याच्या अपघाताची साधी एफआयआर सुद्धा घेतली जात नाही, याची खंत वाटते,” असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. अपघाताच्या तपासात कोणतीही ढिलाई नको, सर्व बाजूंनी तपास होऊन जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.
या प्रकरणात दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. “काहीही झाले तरी दोषींना सोडणार नाही. पूर्ण ताकदीनिशी हा लढा लढू,” असे ठाम विधान त्यांनी पोस्टच्या शेवटी केले आहे.
स्व.दादांच्या अपघात प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती आणि पुरावे आज CID कडे सुपूर्द केले. अपघाताला जबाबदार VSR कंपनी तसेच DGCA विरोधात FIR दाखल करणे का गरजेचे आहे याबाबत चर्चा करून पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्याची विंनती केली. आभाळाएवढी उंची असलेल्या नेत्याच्या अपघाताची साधी FIR… pic.twitter.com/eohc3LJwq5
– रोहित पवार (@RRPSpeaks) 26 फेब्रुवारी 2026
दरम्यान, या प्रकरणात आधीच विविध पातळ्यांवर तपास सुरू असून सीआयडीकडून गुन्हेगारी कोन, निष्काळजीपणा किंवा अन्य कोणतेही कायदेशीर उल्लंघन झाले आहे का, याची चौकशी केली जात आहे. रोहित पवार यांनी पुरावे सुपूर्द केल्यानंतर तपास प्रक्रियेला आणखी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.