टी-20 विश्वचषकात भारताचा ऐतिहासिक पराक्रम! अभिषेक- हार्दिक आणि तिलकच्या शानदार कामगिरीच्या जोरावर केला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम

आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेतील आज 26 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) संघात सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 256 धावांचा डोंगर उभा केला आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील कोणत्याही संघाने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे, तर या चालू विश्वचषकातील (2026) हा सर्वात मोठा स्कोअर ठरला आहे.

मोठ्या विश्रांतीनंतर अभिषेक शर्माने शानदार कामगिरी करत 55 धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना घाम फोडला.

2026 च्या टी-20 विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम याआधी वेस्ट इंडिजच्या नावावर होता. त्यांनी जिम्बाब्वेविरुद्धच 254 धावा केल्या होत्या. मात्र, आता भारताने जिम्बाब्वेविरुद्धच 256 धावा करत नवा इतिहास रचला आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा जागतिक विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. त्यांनी 2007 च्या विश्वचषकात केन्याविरुद्ध 260 धावा केल्या होत्या. भारत हा जागतिक विक्रम मोडण्यापासून केवळ 4 धावांनी मागे राहिला.

टी-20 विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्या:
260 धावा: श्रीलंका (विरुद्ध केन्या)
256 धावा: भारत (विरुद्ध झिम्बाब्वे)
254 धावा: वेस्ट इंडिज (विरुद्ध झिम्बाब्वे)
235 धावा: आयर्लंड (विरुद्ध ओमान)

या विश्वचषकातील पहिल्या तीन सामन्यांत अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) शून्यावर बाद झाला होता, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात त्याला केवळ 15 धावा करता आल्या होत्या. अखेर जिम्बाब्वेविरुद्ध त्याचे बॅट चालली त्याने 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले (जे त्याच्या टी-20 कारकिर्दीतील दुसरे संथ अर्धशतक आहे). त्याने एकूण 30 चेंडूत 55 धावा केल्या.

अभिषेक बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने केवळ 31 चेंडूत 84 धावांची तुफानी भागीदारी केली. हार्दिकने 23 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या, तर तिलक वर्माने त्याच्यापेक्षाही आक्रमक पवित्रा घेत अवघ्या 16 चेंडूत 44 धावा केल्या. या दोघांनी मिळून एकूण 8 षटकार आणि 5 चौकार ठोकले.

Comments are closed.