मेधा सोमय्या मानहानी प्रकरण, संजय राऊत यांची सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. मेधा सोमय्या मानहानी खटल्यात माझगाव कोर्टाने दिलेला निर्णय रद्द करत मुंबई सत्र न्यायालयाने संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली. शौचालय घोटाळ्याच्या आरोपामुळे बदनामी झाल्याचा दावा करीत मेधा सोमय्या यांनी खटला दाखल केला होता. या खटल्याविरोधात संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.

मीरा-भाईंदर महापालिकेतील शौचालये बांधण्याच्या कामातील 3 कोटी 90 लाख रुपयांच्या घोटाळ्याचे वृत्त दै. ‘सामना’ने एप्रिल 2022मध्ये प्रसिद्ध केले होते. ते वृत्त तसेच खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी विधाने केल्याने बदनामी झाली, असा दावा करीत मेधा सोमय्या यांनी माझगाव न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी 15 दिवसांचा साधा तुरुंगवास व 25 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. मात्र पुढच्या 3 मिनिटांतच शिक्षेला स्थगिती देत दंडाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना मोठा दिलासाही दिला होता.

दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात संजय राऊत यांनी अ‍ॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणावर सलग दोन वर्षे सुनावणी पार पडली. अखेर पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी हा निकाल जाहीर करत संजय राऊत यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली.

हा सत्याचा विजय

प्राध्यापक, डॉक्टर मेधा सोमय्या यांची व्यक्तिगत मानहानी करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. घोटाळ्या संदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनीच तक्रार दाखल केली होती. त्याआधारे वक्तव्य केले होते. न्यायालयात सादर केलेले पुरावे, कागदपत्रे यावरून न्यायालयाने योग्य तो निकाल दिला. या निकालाचा आम्ही आदर करतो. हा सत्याचा विजय आहे, असे संजय राऊत म्हणाले.

माझगाव दंडाधिकारी न्यायालयात ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या आम्ही सत्र न्यायालयात मांडल्या. गेले दोन दिवस जो युक्तिवाद केला तो सत्र न्यायालयाने मान्य केला व संजय राऊत यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली, असे अ‍ॅड. मनोज पिंगळे यांनी सांगितले.

Comments are closed.