जोपर्यंत मविआतील तीन पक्ष एकत्र बसत नाही तोपर्यंत राज्यसभेचा तिढा सुटणार नाही! – संजय राऊत
महाराष्ट्रातील सात जागांसह राज्यसभेच्या 37 रिक्त जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अद्याप कोणत्याही नाव जाहीर झालेले नाही. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून जोपर्यंत महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र बसत नाही. तोपर्यंत तिढा सुटणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
संजय राऊत म्हणाले, जोपर्यंत मविआतील तीन पक्ष एकत्र बसत नाही तोपर्यंत तिढा सुटणार नाही. आज प्रत्येक जण आपापला पत्ता फेकत आहे, कुणी 10, कुणी 16, तर कुणी 20 आमदारांच्या जोरावर… यापैकी एकही पक्ष स्वतंत्रपणे सातवी जागा जिंकू शकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. पण राजकारणामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच होत असते. प्रत्येकाला वाटते आपल्या पक्षाचा माणूस जावा. या सगळ्यात शरद पवार वरिष्ठ आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा जास्त होते.
राज्यसभेच्या एका जागेसाठी आत आता स्वाभाविक आहे की, काँग्रेस त्यांचे राजकारण करेल, शिवसेना आपला हक्क कायम ठेवेल. पण तिघांनी एकत्र बसून विधानपरिषद आणि राज्यसभेचा निर्णय घ्यावा लागेल. आमच्या पक्षामध्येही अनेक लोकांची इच्छा आहे. इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही. आमच्या पक्षामध्येही अनेक लोक सक्षम आहेत. पण योग्य व्यक्तीची निवड शिवसेनाप्रमुख करत होते आणि आता उद्धव ठाकरे करतात. तसे नसते तर संजय राऊत राज्यसभेवर कधी गेले नसते. बाळासाहेबांनी मला त्यावेळी पाठवले, असेही राऊत यावेळी म्हणाले.
याचा अर्थ कुणाला तरी या प्रकरणात वाचवण्याचा प्रयत्न सुरू!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, रोहित पवारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. प्रत्येकाला वाटते काहीतरी संशय आहे. रोहित पवार ज्या पुराव्यांसह, ज्या मुद्द्यांसह समोर आले आहेत आणि ज्या पद्धतीने गृहमंत्री फडणवीस, त्यांचे गृहमंत्रालय, पोलीस, डीजीसीए, आणि व्हीएसआर कंपनीविरुद्ध एफआयआर घ्य़ायला तयार नाही. याचा अर्थ कुणालातरी या प्रकरणात वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. रे म्हणजे याविरुद्ध आवाज उठवायची सगळ्यात जास्त जबाबदारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आहे. ते सत्तेत आहेत, त्यांचे मंत्री आहेत, पण त्यापैकी कुणीच काही बोलत नाहीत याचे मला आश्चर्य वाटते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, महाराष्ट्रात त्यांचे मंत्री आहेत. रोहित पवारांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या विषयावर लढायला पाहिजे.
Comments are closed.