लाभले आम्हांस भाग्य…

>> श्रद्धा मोरे

मराठी भाषा ही आपली राजभाषा व भारतातील प्रमुख भाषांपैकी एक आहे. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. ही भाषा समाजाच्या चिंतनशील प्रवाहाला दिशा देण्याचे केंद्र समजली जाते. देदिप्यमान इतिहास लाभलेली आपली मराठी भाषा व तिचा दर्जा अभिजात असून ही एकमेव अशी भाषा आहे, जिच्या साधारण 42 बोलीभाषा बोलल्या जातात. मराठी ही भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी जगातील दहाव्या व भारतातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे याचा अभिमान वाटतो.

मराठी भाषेला खऱया अर्थाने ज्यांनी जिवंत केले व जोपासले ते व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मराठी संस्पृती टिकली तरच मराठी भाषा टिकेल या दृष्टिकोनातून महाराजांनी मराठी भाषेत पहिला शब्दकोश लिहिला. 11 व्या शतकात मुपुंदराजांनी ‘विवेकसिंधू’ हा पहिला ग्रंथ मराठीमध्ये लिहिला. त्यानंतर मग अनेक लेखकांनी तो वारसा जपत ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र, लेख, कथा, कविता, नाटक, नाटय़, बाल साहित्य, बालगीते, ललित लेख, विनोद, अग्रलेख, संपादकीय,स्तंभलेख,समीक्षा, चारोळी, गझल, ओवी, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा, लावणी, भारूड, बखर, पोथी, आरती, लोकगीत, गोंधळ, गवळण, उखाणे, वाक्प्रचार अशा अनेक साहित्याची शिदोरी आपणाला दिली हे महाराष्ट्र जाणतो.

मराठी भाषेची गाथा कवितेतून आताच्या पिढीला सांगायची तर पुढील शब्दांत मांडावीशी वाटते ती म्हणजे –

‘माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतीने
फक्त कानोसा घ्या
कधी ऐकशील तेव्हा
माझी शिल्पातील चित्रे
तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खोलून
कधी पाहशील तेव्हा
माझा रांगडा इतिहास
ग्रंथ, ज्ञानेश्वरीत साचला
तुझ्या उषेच्या कानी
कधी टिपशील तेव्हा
ऊर अभिमानाने भरेल
मला वाचशील जेव्हा
जपायचे नेमके काय,
गडी प्रश्नात गुंतला
कोडे सुटेल क्षणात
जाणशील मराठी जेव्हा

लोकव्यवहारात आधी वापरली जाणारी मराठी भाषा पुढे अजून समृद्ध होऊन ग्रंथ, वेद, पुराण,लेख, संगीत, व साहित्यातून अधिक नावारूपाला आली. या भाषेला देवनागरीची जोड मिळाल्याने तिचे भाषिक सौंदर्य खुलून आले. त्यामुळे मराठी वर्णमाला, मुळाक्षरे, ऱहस्व, दीर्घ व त्याचं व्याकरण सर्वांना ज्ञात झाले. मराठीतले पहिले वाक्य म्हणजे श्रवणबेळगोळ जे बाहुबलीच्या पुतळ्याखाली लिहिलेय.

‘श्री चामुंडराजे करवीयले
गंगाराज्ये सुताले करवीये’

मराठी भाषेतील शाब्दिकीकरण करून मराठी शब्द अंगवळणी पडावेत यासाठीचा खरा प्रयत्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केला. कारण मराठी भाषेत अनेक प्राकृत भाषा सामाविष्ट असल्याने मराठी शब्द व भाषा यांची गळचेपी होऊ नये हा त्यामागचा हेतू होता. उदाहरणार्थ – दिनांक, महापौर, गोलंदाज, फलंदाज, धावपट्टी व अनेक हे शब्द सावरकरांनी प्रचलित केले.

मराठी भाषेचं अजून एक विशेष वैशिष्टय़ सांगायचं म्हणजे मोरोपंत यांनी मराठीत लिहिलेलं 108 पद्धतीतलं रामायण. नवजात बालकाला जसे बाळकडू म्हणून आईचं दूध पाजले जाते अगदी तसेच मराठी भाषेचं बाळकडू आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मोरोपंत यांनी दिलेय हे वाखाणण्याजोगे आहे. म्हणूनच अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी उगाच नाही म्हटले –

‘माझ्या मराठीचे बोलू कौतुके
परी अमृताहूनी पैजा जिंके’

Comments are closed.