… तर तुमच्या जमिनीवर बोजा घेण्यात येईल; चूक प्रशासनाची, सरकारचे शेतकऱ्यांना ‘तुघलकी फर्मान’
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तहसील कार्यालयाकडून काही शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर दुबार अनुदान आल्याचे सांगत सरकारने या नोटीसा बजावल्या आहेत. शेतकऱ्यांनी दुबार अनुदान सरकारच्या खात्यात परत टाकावे अन्यथा त्यांच्या जमिनीवर बोजा घेण्यात येईल असे या नोटीसीत म्हटले आहे.
शेतकऱ्यांना पिळण्यात या महायुती सरकारचा हात देशात कोणी धरू शकत नाही. प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेल्या पैशांच्या वसुलीसाठी सरकार अशा ‘पठाणी’ पद्धतीने ‘फरमान’ काढत सुटले आहे. चूक करणारे मोकाट सोडले आहेत आणि शेतकऱ्यांना या चुकांची शिक्षा दिली जात आहे.… pic.twitter.com/K7S1jowr9e
— अंबादास दानवे (@iambadasdanve) २७ फेब्रुवारी २०२६
गंगापूर तालुक्यातील कनकोरी गावातील शेतकरी एकनाथ विनायक पवार या शेतकऱ्याला सरकारकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या खात्यावर 4080 रुपये इतके दुबार अनुदान प्राप्त झाल्याचे या नोटीसीत म्हटले आहे. त्या नोटीसीत शासनाच्या खात्याचा खाते क्रमांक देण्यात आला असून त्यात हे दुबार अनुदान परत टाकण्यास सांगितले आहे. जर तसे केले नाही तर त्यांच्या मालमत्तेवर बोजा घेण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारने शेतकऱ्यांना दिला आहे. अशी नोटीस एकनाथ पवार यांच्यासोबत इतरही काही शेतकऱ्यांना बजावण्यात आली आहे.
याबाबत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ व नोटीसीचा फोटो शेअर करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ”शेतकऱ्यांना पिळण्यात या महायुती सरकारचा हात देशात कोणी धरू शकत नाही. प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेल्या पैशांच्या वसुलीसाठी सरकार अशा ‘पठाणी’ पद्धतीने ‘फर्मान’ काढत सुटले आहे. चूक करणारे मोकाट सोडले आहेत आणि शेतकऱ्यांना या चुकांची शिक्षा दिली जात आहे”, असे अंबादास दानवे यांनी ट्विट केले आहे.
Comments are closed.