मुंबईत वाढत्या वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगात मोठी वाढ; 57 टक्के रुग्ण प्रदूषणाचे बळी
मागील अनेक दिवसांपासून मुंबईला प्रदूषणाने विळखा घातला आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. वायू प्रदूषण थेट फुफ्फुसावर आघात करीत आहे. प्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेत सादर करण्यात आलेल्या कर्करोग तपासणी मोहिमेच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत निदान झालेल्या कर्करोगाच्या 57 टक्के रुग्णांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. याला प्रामुख्याने शहरातील वाढते प्रदूषण कारणीभूत असल्याचे उघडकीस आले आहे.
आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाचे निष्कर्ष विधानसभेत सादर केले. त्यात दाट लोकवस्तीच्या शहरी भागात वायू प्रदूषकांच्या दीर्घकालीन संपर्कामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. सूक्ष्म कणयुक्त पदार्थ (PM2.5) आणि वाहतुकीशी संबंधित नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) यांसारखे हवेतील विषारी पदार्थ दीर्घकालीन श्वसनरोगांशी तसेच धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्येही कर्करोगाचा धोका वाढवत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रदूषण नियंत्रण, वेळीच निदान करण्यासंबंधी पायाभूत सुविधा आणि जनजागृती यांतील तफावत समोर आली असून ती तफावत दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा आरोग्य क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विभागाने संपूर्ण राज्यभरात कर्करोग तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान राज्यभरात कर्करोगाचे 1,677 रुग्ण आढळून आले. त्यात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांचे लक्षणीय प्रमाण मुंबई शहरात आढळले. निदान झालेल्या कर्करोगाच्या रुग्णांपैकी 57 टक्के रुग्ण हे वायू प्रदूषणाशी संबंधित कर्करोगाचे आढळले. ही चिंताजनक बाब असून याला सर्वस्वी हवेची खराब गुणवत्ता कारणीभूत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Comments are closed.