बँकर लोकोमोटिव्हच्या ब्रेकमध्ये बिघाड, पळसदरीजवळ मालगाडीने वेगमर्यादा ओलांडली
लोणावळा घाटातून उतरत असताना ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने पळसदरीजवळ मालगाडी अनियंत्रित झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने मालगाडी ताशी 33 किमीऐवजी 100 किमी वेगाने धावू लागली. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत कर्जत-भिवपुरी दरम्यान वेग नियंत्रणात आणून गाडी थांबवली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. यात कोणतीही दुर्घटना किंवा जीवितहानी झाली नाही. मध्य रेल्वेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
बँकर लोकोमोटिव्हच्या ब्रेकमध्ये समस्या झाल्याने ही घटना घडली. गुरुवारी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास बँक लोकोमोटिव्हमध्ये ब्रेकशी संबंधित समस्या निर्माण झाल्यानंतर ट्रेनने निर्धारित वेग ओलांडला. बँकर लोको स्टाफ, ट्रेन वाहून नेणारे लोकोमोटिव्ह क्रू आणि ट्रेन मॅनेजरसह सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. या घटनेमुळे काही काळासाठी या मार्गावरील लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
Comments are closed.