Beed News – महादेव मुंडे हत्याकांडाचा पर्दाफाश होणार? नार्को टेस्टचा अहवाल आज उघड होणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घुण हत्येप्रकरणी युद्ध पातळीवर तपास सुरू आहे. हे प्रकरण एसआयटीकडे सोपवण्यात आले आहे. एसआयटीने नुकतीच यातील संशयितांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपींग करण्यात आली होती. या दोन्हीचाही अहवाल शुक्रवारी एसआयटीच्या हाती सोपवण्यात आला. शनिवारी न्यायालयासमोर हा अहवाल उघड केला जाणार आहे.

महादेव मुंडे हत्या प्रकरणातील ही सर्वात मोठी अपडेट असणार आहे. महादेव मुंडेंच्या हत्येमध्ये कोणाचा हात आहे आणि मास्टर माईंड कोण आहे हे ही समोर येणार असल्याने सर्वांचे लक्ष या अहवालाकडे लागले आहे. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची २० ऑक्टोबर २०२३ रोजी परळीतील तहसील कार्यालयासमोर निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत करण्यात आले.

त्यात आ.सुरेश धस यांनी केवळ बारा गुंठ्याच्या वादातून वाल्मीक कराड आणि त्याच्या मुलाने ही हत्या केल्याचा खुलासा केला होता. तर बाळा बांगर यांनीही या संदर्भात महादेव मुंडेंच्या हत्येनंतर वाल्मीक कराडने महादेव मुंडे यांचे आतडे आणि हाड आणि रक्त टेबलावर ठेवले होते असा गंभीर आरोप बाळ बांगर यांनी केल्याने या हत्येची गंभीरता समोर आली. त्यानंतर न्याय मिळावा यासाठी महादेव मुंडेंच्या कुटुंबाने मोठा संघर्ष केला.

अखेर सरकारने आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमले. या तपास पथकाने बाळा बांगर यांचा ऑनकॅमेरा जबाब नोंदवला होता. दुसरीकडे एसआयटीने या प्रकरणात दोनशे पेक्षा जास्त लोकांची चौकशी केला. पाचशेपेक्षा जास्त नागरिकांच्या कॉल डिटेलची तपासणी केली. महादेव मुंडेंची हत्या आर्थिक व्यवहारातून झाली का, की प्लॉटच्या व्यवहारातून झाली असा सर्वच बाजूने तपास केला होता.

एसआयटीने काही दिवसांपूर्वीच संशयितांची नार्कोटेस्ट आणि ब्रेन मॅपींग केली होती. या दोन्ही तपासणीचा अहवाल विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे. शनिवारी न्यायालयासमोर हा अहवाल उघडण्यात येणार असल्याने तपासात नेमके दडलंय काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.