‘ते पाहून मला नवल वाटलं’, गावसकरांनी केलं अभिषेक शर्माचं कौतुक; विंडीज सामन्यासाठी टीम इंडियाला हा इशारा

​टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये गुरुवारी भारताने झिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय मिळवला. या विजयाव्यतिरिक्त संघासाठी सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे अभिषेक शर्माचा फॉर्म. या सामन्यापूर्वी खेळलेल्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांत अभिषेकला भोपळाही फोडता आला नव्हता, ज्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका होत होती. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू दिला नाही. अभिषेकनेही या विश्वासाला सार्थ ठरवत ५५ धावांची तुफानी खेळी साकारली. या कामगिरीनंतर महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत अभिषेकचे कौतुक केले, पण या स्फोटक फलंदाजाला बचावात्मक (Defensive) शॉट्स खेळताना पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या महामुकाबल्यासाठी त्यांनी टीम इंडियाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

​गावसकर ‘जिओस्टार’शी बोलताना म्हणाले, “अभिषेक शर्मा किती दर्जेदार फलंदाज आहे हे आपल्याला माहित आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या ५५ धावांच्या खेळीने त्याने आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.” ते पुढे म्हणाले की, “अभिषेकने आपला नैसर्गिक खेळ सुरू करण्यापूर्वी थोडा वेळ घेतला. त्याच्या फलंदाजीत एक शिस्त दिसली. त्याने ऑफ-स्पिनरचा आदर केला, कोणताही अनावश्यक धोका पत्करला नाही आणि अत्यंत शांत व संयमित पद्धतीने फलंदाजी केली.”

​गावसकर यांनी पुढे नमूद केले की, “या सामन्यात त्याने खरोखरच काही बचावात्मक शॉट्स खेळले आणि चेंडू अडवले देखील. हे पाहून मला नवल वाटले, कारण आपण सहसा अभिषेकला असे खेळताना पाहत नाही. अभिषेकसाठी हा शिकण्याचा काळ आहे.” ते म्हणाले, “प्रत्येक क्रिकेटपटू अशा टप्प्यातून जातो जिथे सलग दोन सामन्यांत धावा होत नाहीत. महत्त्वाचे हे आहे की तुम्ही त्यातून काय शिकता. मला वाटते अभिषेकने खूप काही शिकले आहे आणि याचा फायदा त्याला कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात होईल.” दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाने बोध घेतला आणि डावखुरा-उजव्या हाताचा फलंदाजीचा ताळमेळ (Left-Right combination) राखण्यासाठी संजू सॅमसनला वरच्या फळीत परत आणले, असेही गावसकरांनी सांगितले.

​ते पुढे म्हणाले, “असे म्हणतात की जोपर्यंत एखादी गोष्ट बिघडत नाही तोपर्यंत ती दुरुस्त करण्याची गरज नसते, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताला जाणीव झाली की वरच्या फळीत उजव्या आणि डावखुऱ्या फलंदाजांची जोडी असणे गरजेचे आहे. जुन्या चुकांमधून धडा घेणे महत्त्वाचे होते.” गावसकर यांनी इशारा दिला की रविवारी कोलकाता येथे होणाऱ्या ‘नॉकआउट’सारख्या सामन्यात भारताला वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजीपासून सावध राहावे लागेल. ते म्हणाले, “वेस्ट इंडिज हे एक वेगळे आव्हान आहे. त्यांना हलक्यात घेता येणार नाही. त्यांचे फलंदाज उत्तम फॉर्ममध्ये आहेत आणि गोलंदाजही चांगली कामगिरी करत आहेत. ते विरोधी संघाच्या चुकांचा फायदा घेतात आणि योग्य वेळी बळी मिळवतात. विंडीजच्या फलंदाजांना रोखण्यासाठी भारताला अचूक रणनीती आखावी लागेल.”

Comments are closed.