या दिवसापासून सुरू होणार आयपीएल 2026 चा थरार! समोर आली मोठी अपडेट

आयपीएल 2026 साठी सर्व फ्रँचायझींनी आपली तयारी सुरू केली आहे. टी-20 विश्वचषकादरम्यान सराव शिबिरांनाही सुरुवात झाली आहे. दरम्यान, आयपीएलच्या 19 व्या हंगामाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, नवीन हंगामाच्या सुरुवातीला 2 दिवसांचा उशीर होऊ शकतो. बीसीसीआयने (BCCI) अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही, कारण दोन तारखांबाबत पेच निर्माण झाला आहे. या स्पर्धेची सुरुवात 28 मार्च रोजी होऊ शकते, तर 29 मार्च या तारखेवरही विचार केला जात आहे.
आयपीएल 2026 साठी झालेल्या ‘मिनी ऑक्शन’च्या वेळी फ्रँचायझींना स्पर्धा सुरू होण्याची तारीख 26 मार्च सांगण्यात आली होती, परंतु आता त्यात बदल होऊ शकतो. त्यावेळी फायनलसाठी 31 मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र जर सुरुवातीच्या तारखेत बदल झाला तर फायनलची तारीख देखील पुढे ढकलली जाऊ शकते. रिपोर्टनुसार, आयपीएलच्या वेळापत्रकाची (Schedule) अधिकृत घोषणा पुढच्या आठवड्यात होऊ शकते. याचा अर्थ मार्चच्या पहिल्या आठवड्यात बीसीसीआयकडून वेळापत्रकाचे अधिकृत पत्रक जाहीर होऊ शकते.
फ्रँचायझींना अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु चर्चा सातत्याने सुरू आहे. 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयकडून आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यास विलंब होत आहे. तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर होण्याची बोर्ड प्रतीक्षा करत आहे. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की, बोर्ड सुरुवातीला अर्ध्या वेळापत्रकाची घोषणा करेल आणि उर्वरित वेळापत्रक निवडणुकांच्या तारखांनुसार जाहीर केले जाईल.
Comments are closed.