Ranji trophy final: जम्मू-काश्मीर ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; कर्नाटकविरुद्ध घेतली 477 धावांची मोठी आघाडी!

रणजी ट्रॉफीच्या (Ranji trophy) अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरचा संघ इतिहास रचण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जम्मू-काश्मीरने कर्नाटकविरुद्ध 477 धावांची प्रचंड आघाडी घेतली असून सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.

जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांसमोर कर्नाटकचे फलंदाज हतबल दिसले. संपूर्ण संघ पहिल्या डावात 293 धावांवर बाद झाला. आकिब नबीने (Aakib Nabi) शानदार गोलंदाजी करत 54 धावांत 5 विकेट्स घेतल्या. तर कर्नाटककडून केवळ मयंक अग्रवालने झुंज दिली. त्याने160 धावांची खेळी केली, पण तोदेखील आकिब नबीचा शिकार ठरला. इतर गोलंदाजांमध्ये सुधीर कुमार आणि युधवीर सिंह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

कर्नाटकला स्वस्तात गुंडाळल्यानंतर जम्मू-काश्मीरकडे ‘फॉलो-ऑन’ देण्याची संधी होती, पण त्यांनी स्वतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या कामरानने दुसऱ्या डावात धडाकेबाज फलंदाजी केली. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा तो 94 धावांवर नाबाद खेळत आहे. जम्मू-काश्मीरने दुसऱ्या डावात 4 बाद 186 धावा केल्या आहेत. आता सर्वांचे लक्ष पाचव्या दिवसाच्या खेळाकडे आहे. जम्मू-काश्मीर हा सामना जिंकून पहिल्यांदाच रणजी चॅम्पियन बनणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Comments are closed.