शितं फेकताय, भुतं जमवताय, पण हीच भुतं मानगुटीवर बसतील! उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाने आयोजित केलेल्या विशेष सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

मुंबईमध्ये मराठी माणसाने आपली ताकद दाखवली. महापौर आपला होऊ शकला नाही, पण परत होणार नाही असे नाही. मुंबई आपल्याकडेच येणार. नक्की येणार आणि महाराष्ट्रसुद्धा येणार. हळूहळू लोकांच्या डोळय़ावरची पट्टी जशी बाजूला होईल तसतसे सगळे जण त्यांना सोडून पुन्हा चांगल्या मार्गावरून चालायला लागतील, असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पह्डापह्डीच्या राजकारणावर आज तोफ डागली. ‘असतील शिते तर जमतील भुते’ असं आता चाललंय. भुतं त्यांना गोळा करू द्या, पण तीच भुतं मानगुटीवर बसतील तेव्हा जीव नकोसा होईल हे लक्षात ठेवा. ही भुतं तुमच्या डोक्यावर नाचतील. शितं फेकताय… शितं संपतील, मात्र तोपर्यंत एवढी भुतं झाली असतील की, त्या बाधेमुळेच तुम्ही तिथल्या तिथे कोसळाल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनी मराठीचा जागर करण्यात आला. मरीन लाइन्सच्या बिर्ला मातोश्री सभागृहात भव्य सोहळय़ाचे आयोजन महासंघाने केले. या सोहळ्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती, मराठी भाषा भवन, सरकारची मराठीबद्दलची अनास्था यासह अनेक मुद्दय़ांवरून टीकेची झोड उठवली.

रामराज्य पाहिजे असेल तर आधी रामराज्याचे दाखले काढा आणि प्रभू श्रीरामाने जसे राज्य केले तसे करा. आता जे राज्य चाललं आहे फोडाफोडीचं ते रामराज्याचं प्रतीक समजायचं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

कारण उघड सत्य आहे…

संजय राऊत यांच्यावर केस टाकली. तेही निर्दोष सुटले. कारण कोणते कळलं ना…कारण उघड सत्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणताच हशा पिकला. सत्य उघडं झाल्यानंतर त्यासमोर कुणाचं काही चालत नाही हेच त्यात दिसून आलं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रादेशिक संस्कृती, भाषा मारून टाकण्याची भाजपची नीती!

महाराष्ट्राला प्रादेशिक पक्षाची गरज आहे आणि त्यासाठी शिवसेना आहेच. दरवेळा काही झाले की, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो. देशावर कोणताही घाला येवो, पहिला महाराष्ट्र धावून जातो. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा हा इतिहास आहे. महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव आहे. तो जर कोणी दोष मानत असेल तर ते दुर्दैव आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्हाला मराठी भाषेचा अभिमान जरुर आहे. तुम्ही आमच्या घरात राहता आणि मोठे होता. त्यानंतर आमच्याच घरावर मालकी सांगता? प्रादेशिक भाषा आणि संस्कृती मारून टाकण्याची भाजपची नीती आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

मराठी माणूस ताठ  मानेने वावरणार

जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत मराठी माणूस ताठ मानेने वावरणार आहे. शिवसेनेने काय केले हे त्यांनी विचारू नये. भाजप मराठी माणसासाठी किती वेळा रस्त्यावर उतरला हे सांगावे. मराठीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांनी मराठीला अडवून दाखवावेच, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

दीपक पवार यांना पुरस्कार

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे दरवर्षी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी योगदान करणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले

यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई, आमदार अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, राजन विचारे, उपनेते आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, महेश सावंत, बाळा नर, मिलिंद नार्वेकर, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, विलास पोतनीस, विभागप्रमुख संतोष शिंदे उपस्थित होते.

ममता बॅनर्जी यांच्या हिमतीला दिली दाद

मराठी माणसांकडे वाकडय़ा नजरेने पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचे सांगताना उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हिमतीला दाद दिली. बंगालमध्ये ममता बॅनर्जी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. संपूर्ण बंगाली माणूस त्यांच्या मागे उभा राहतो. त्यामुळे दिल्लीची त्यांच्याकडे नजर वाकडी करून पाहण्याची हिंमत होत नाही. ईडी आली तरी ही महिला घुसते सरळ.. फाईल घेऊन जाते.. काय करताय ते करा जा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. तामीळनाडूतही हीच स्थिती असल्याचे ते म्हणाले.

चक्की पिसिंग… नंतर बाजूला बसिंग!

दुर्दैवी अपघात झाला आणि अजितदादांचे निधन झाले. त्यांना विधान परिषदेत श्रद्धांजली वाहताना मी म्हटलं, एखादा माणूस गेल्यानंतर त्याचं महत्त्व गाऊन काय उपयोग आहे. तो असतो तेव्हा त्याला जीव द्यावासा वाटेल एवढं बदनाम करून टाकायचं…70 हजार कोटींचा घोटाळा…अजित पवार चक्की पिसिंग…चक्की पिसिंग आणि नंतर बघितलं तर बाजूला बसिंग, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांना टोला हाणला.

कोणत्याही भाषेचा द्वेष करीत नाही, पण जबरदस्ती नको!

आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करीत नाही; पण आमच्यावर जबरदस्ती करू नका. जोपर्यंत ऐकताय तोपर्यंत नम्र विनंती आहे. शिवसेनेचा जन्मच मुळात मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी झाला आहे. आम्ही दोघे भाऊ मराठीसाठी एकत्र आलो. आता मुख्यमंत्री त्याचे श्रेय घेताहेत. हे विं. दा. करंदीकर यांच्या कवितेतील ओळीप्रमाणे आहे, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी ओळी ऐकवल्या. ‘लढवून बांधवांना संहार साधणारा, गीता खुशाल सांगे, इलाज काय त्याला’, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. आधी भांडणे लावायची आणि नंतर सांगायचे, आम्हीच सगळे केले. फुकटच्या गोष्टीचे श्रेय कशाला घेता, असे ते म्हणाले.

‘जादूची पेटी’ची मराठी मनांवर जादू

मराठी गौरव दिनाच्या शानदार सोहळ्यावेळी मंदार कर्णिक संयोजित प्रसिद्ध हार्मोनियम वादक व संगीत संयोजक आदित्य ओक आणि सिंथेसायझर वादक सत्यजित प्रभू यांच्या बहारदार सादरीकरणातून ‘जादूची पेटी’ या लोकप्रिय कार्यक्रमानेही सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमातून मराठी संस्कृतीचा जागर करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. मराठी भाषा गौरव दिनाच्या सोहळ्यानिमित्त संपूर्ण चर्चगेट, मरिन लाईन्स परिसरात भगव्या पताका, भगवे झेंडे आणि मराठी भाषेचा जयघोष करणारे बॅनर्स जागोजागी झळकले होते. संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. विविध कार्यक्रमांची रेलचेल, भगवे वातावरण आणि मराठीच्या जयजयकारामुळे तमाम मराठी माणसांच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले. हा दिमाखदार सोहळा यशस्वी करण्यासाठी महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर, अनिल चव्हाण, प्रदीप बोरकर, दिनेश बोभाटे, उमेश नाईक, उल्हास बिले, सुधाकर नर, शरद एक्के, श्रीराम विश्वासराव, विलास जाधव, अजय गोयजी, शरद जाधव, राजन तांडेल, बाळासाहेब कांबळे, प्रदीप पाटील, निलिमा भुर्पे, शर्वरी शेटये, हर्षला परब आदींनी मेहनत घेतली.

मराठी भाषा भवन, रंगभूमी दालनाचे काय झाले?

मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा सक्तीची केली. महाराष्ट्र म्हटले की मराठीच असली पाहिजे. ते मी केले. पण भाजपवाल्यांची सवयच आहे, जुने दळण दळत बसायचे. ते एवढे दळत बसायचे की, लोक ते खरे मानायला लागतील. हिंदीच्या सक्तीचा अहवाल आम्ही घेतला. त्यासाठी समिती नेमली होती, पण त्या समितीची बैठकच झालेली नाही. तो निर्णय जर आम्हीच घेतला असे लादणार असाल तर मग इतर निर्णयांचे काय? मराठी भाषा भवन अद्याप उभे का राहत नाही? मी गिरगावला मराठी रंगभूमीचे दालन उभे करणार होतो, ते भाजप सरकारने रद्द केले आणि ती जागा बिल्डरच्या घशात घातली. ते का अमलात आणले नाही? भूखंड ढापून भाजपचे कार्यालय उभे राहू शकते, मग मराठी भाषा भवन, मराठी रंगभूमी दालन का नाही? मुहूर्त शोधता का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मनाचे श्लोक वाचले तर कोणी भाजपात जाणार नाही!

मनाचे श्लोक रोज जर का वाचले तर कोणी भाजपात जाणारच नाही एवढी ताकद मनाच्या श्लोकांमध्ये आहे. जगायचं कसं हे त्यात लिहिलं आहे. अहंकार झाल्यानंतर रावणाची लंकासुद्धा क्षणात उद्ध्वस्त झाली मग तुझं काय आहे. या मनाच्या श्लोकांचे हिंदीकरण करून ते संपूर्ण देशात वाटले पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आजच अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांची  निर्दोष मुक्तता झाली. त्यांचे मी अभिनंदन करतो. एका राज्याचा निवडून दिलेला मुख्यमंत्री आणि मंत्री पदावर असताना त्यांना तुम्ही तुरुंगात टाकलं. कोर्टासमोर पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली. आता पुरावे नसताना त्यांना अटक करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे… टाका त्या अधिकाऱ्यांना आतमध्ये!

हे रामराज्य मी मानायला तयार नाही. एकतर तुरुंगात जा नाहीतर आमच्या पक्षात ये. हे रामराज्य नाही. प्रभू श्रीरामांनी कधी असे केले नाही. लढायचे तर समोर लढ ना. तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन. लढ ना मैदानात येऊन. ईव्हीएमसारखी जादूची पेटी वापरून कशाला आमच्यावरती विजय मिळवता?

Comments are closed.