ऑस्ट्रेलियन महिला संघाने सलग दुसरा सामना जिंकला
वृत्तसंस्था, होबार्ट
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिलांच्या दुसऱ्या सामन्यात सामनावीर जॉर्जिया व्हॉलचे दमदार शतक तसेच लिचफिल्डच्या 80 धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 गड्यांनी पराभव केला. या विजयामुळे यजमान ऑस्ट्रेलियाने या मालिकेत भारतावर 2-0 अशी आघाडी मिळविली. भारताच्या प्रतीका रावल आणि कर्णधार हरमनप्रित कौर यांची अर्धशतके वाया गेली.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकली होती. त्यामुळे भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर गुणांत आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकेतील सलग दोन सामने जिंकत या दौऱ्यातील क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये 6-4 अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील शेवटचा वनडे सामना आणि त्यानंतर एकमेव कसोटी बाकी आहे. वनडे सामन्याला दोन गुण तर एकमेव कसोटीला चार गुण आहेत.
शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकांत 9 बाद 251 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 36.1 षटकांत 5 बाद 252 धावा जमवित हा सामना 83 चेंडू बाकी ठेवून पाच गड्यांनी जिंकली.
भारताच्या डावामध्ये प्रतीका रावल आणि स्मृती मानधना यांनी सलामीच्या गड्यासाठी 99 चेंडूत 78 धावांची भागिदारी केली. भारताच्या डावाला चांगली सुरूवात झाल्यानंतर चुकीचे फटके मारण्याच्या नादात भारतीय फलंदाज झटपट बाद झाल्या. सलामीच्या स्मृती मानधनाला 2 जीवदाने मिळाली. पण त्याचा तिला लाभ घेता आला नाही. गार्डनरच्या गोलंदाजीवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात मानधनाचा त्रिफळा उडाला. तिने 4 चौकारांसह 31 धावा जमविल्या. जेमिमा रॉड्रिग्स सदरलँडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने 11 धावा केल्या. प्रतीका रावलने 81 चेंडूत 6 चौकारांसह 52 धावा जमविल्या. एकेरी धाव घेण्याच्या नादात ती धावचीत झाली. किंगच्या गोलंदाजीवर दीप्ती शर्मा केवळ एका धावेवर झेलबाद झाली. हरमनप्रित कौरने 70 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 54 धावा जमविल्या. हरमनप्रित कौर आणि के. गौतम यांनी सातव्या गड्यासाठी 55 धावांची भागिदारी केल्याने भारताला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. रिचा घोषने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22, के. गौतमने 2 चौकारांसह 25, क्रांती गौडने 3 चौकारांसह 19 आणि वैष्णवी शर्माने 2 चौकारांसह नाबाद 10 धावा जमविल्या. भारताच्या डावात 2 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे गार्डनर, सदरलँड आणि किंग यांनी प्रत्येकी 2 तर कॅरे आणि मेगन शूट प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावात पाचव्या षटकांतच काश्वी गौतमने कर्णधार अॅलिसा हिलीचा 6 धावांवर त्रिफळा उडविला. त्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांना अधिक यश मिळू शकले नाही. लिचफिल्ड आणि व्हॉल या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 119 धावांची शतकी भागिदारी करुन आपल्या संघाच्या विजयाचा पाया रोवला. लिचफिल्डने 62 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 80 धावा झळकविल्या. ती डावातील 20 व्या षटकांत त्रिफळाचीत झाली. गौडने तिचा त्रिफळा उडविला.
जॉर्जिया व्हॉल आणि बेथ मुनी यांनी तिसऱ्या गड्यासाठी 82 धावांची भागिदारी केली. व्हॉलने 82 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह 101 धावा जमविल्या. काश्वी गौतमने तिला झेलबाद केले. बेथ मुनीने 34 चेंडूत 5 चौकारांसह 31 धावा जमविल्या. सदरलँड 10 धावांवर बाद झाली. गार्डनर आणि मॅकग्रा यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. गार्डनरने 2 चौकारांसह नाबाद 19 धावा जमविल्या. भारतातर्फे काश्वी गौतम आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर क्रांती गौडने 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाच्या डावात 2 षटकार आणि 32 चौकार नोंदविले गेले. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होबार्टमध्ये रविवारी खेळविला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत 9 बाद 251 (हरमनप्रित कौर 54, प्रतीका रावल 52, मानधना 31, के. गौतम 25, रिचा घोष 22, क्रांती गौड 19, अवांतर 13, सदरलँड, गार्डनर, किंग प्रत्येकी 2 बळी, कॅरे, शूट प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया 36.1 षटकांत 5 बाद 252 (जॉर्जिया व्हॉल 101, लिचफिल्ड 80, मुनी 31, गार्डनर नाबाद 19, सदरलँड 10, काश्वी गौतम व दीप्ती शर्मा प्रत्येकी 2 बळी, क्रांती गौड 1-54
Comments are closed.