रिंकू सिंगच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले

वृत्तसंस्था/ अलिगड

भारतीय क्रिकेट संघाचा उदयोन्मुख स्टार आणि फिनिशर रिंकू सिंगचे वडील खानचंद्र सिंग यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून स्टेज-4 यकृताच्या कर्करोगाशी झुंजत होते. शुक्रवारी त्यांनी ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनामुळे रिंकू सिंगच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. 2026 च्या टी-20 विश्वचषकाचे सामने सुरू असतानाच रिंकू दु:खसागरात बुडाला आहे. रिंकू विश्वचषकाच्या मध्यातच व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या वडिलांना पाहण्यासाठी घरी परतला होता.

क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांवर शुक्रवारीच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचा मोठा भाऊ सोनू याने अंत्यसंस्कारावेळी चितेला अग्नी दिला. रिंकूने त्याचे वडील खानचंद्र सिंग यांच्या पार्थिवाला खांदा दिला. वडिलांच्या अंतिम प्रवासात दोघांनाही अश्रू थांबवता आले नाहीत. अलिगडमधील ओझोन सिटी येथून अंत्ययात्रा निघाल्यानंतर क्वार्सी येथील शंकर विहार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

रिंकूचे वडील खानचंद्र सिंग उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये एलपीजी सिलिंडर पुरवत होते. मर्यादित उत्पन्न, मोठे कुटुंब आणि दैनंदिन संघर्ष असूनही त्यांनी  कधीही आपल्या कठोर परिश्रमाशी तडजोड केली नाही. रिंकूनेही आपल्या वडिलांना सिलिंडर पुरवण्यास मदत केली होती. रिंकूच्या खेळात दिसणारा संयम, नम्रता आणि संघर्ष त्याच्या वडिलांच्या शिकवणीत रुजलेला आहे.

Comments are closed.