T20 WC26: भारत सेमी-फायनलमध्ये पोहोचला तर कोणाशी भिडणार? संघ निश्चित

आयसीसी पुरुष टी२० विश्वचष २०२६ आता शेवटाला आला आहे. सुपर-८च्या ग्रुप-१ मधील दक्षिण आफ्रिकेने सर्वात आधी उपांत्य फेरीत जागा पक्की केली. या स्पर्धेत त्यांची कामगिरी सर्वोत्तम झाल्याचे दिसले. तसेच तो एकमेव असा संघ आहे, ज्याने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. यामुळे त्यांनी सुपर-८चे दोन्ही सामने जिंकल्याने नेट रनरेटही उत्तम ठेवला आहे. याच ग्रुपमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एक मार्चला कोलकातामध्ये सामना खेळला जाणार आहे. हा सामना या दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीचे तिकीट असणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिजसाठी कोलकाताच्या ईडन गार्डनवर होणारा हा सुपर-८चा सामना ‘करो वा मरो’ स्थितीचा असणार आहे. भारताचे सध्या २ सामन्यानंतर दोन अंक झाले असून वेस्ट इंडिजचेही तेवढेच आहेत. यामुळे हा सामना भारताने जिंकला तर त्यांचे ४ अंक होतील आणि उपांत्य फेरीत प्रवेश करेल. वेस्ट इंडिजलाही हा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. यामुळे दोन्ही संघांमध्ये चांगलीच चढाओढ दिसणार आहे.

आता सर्वात मोठा प्रश्न जर भारत उपांत्य फेरीत पोहोचला, तर त्यामध्ये कोणाशी भिडणार? आयसीसीच्या नियमानुसार ग्रुप-१मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेला संघ ग्रुप-२मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या संघाशी उपांत्य फेरीत लढणारा. यामुळे ग्रुप-२मध्ये अव्वल स्थानावर इंग्लंड आहे. त्यांनी सुपर-८चे तिन्ही सामने जिंकत ६ अंक मिळवले आहेत. यामुळे उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना होईल.

उपांत्य फेरीचा हा सामना ५ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या दोन्ही संघांमध्ये २०२२च्या टी२० विश्वचषकात उपांत्य फेरीचा सामना झाला होता. त्यामध्ये इंग्लंड वरचढ ठरला होता. आता घरच्या मैदानावर भारताला इंग्लंडविरुद्ध तो बदला पूर्ण करण्याची संधी आहे. तसेच इंग्लंडही या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत असून हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

भारताने या स्पर्धेत सर्व साखळी सामने जिंकत सुपर-८मध्ये प्रवेश केला होता. त्यामध्ये पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पराभवाचा धक्का दिला होता. नंतर झिम्बाब्वेविरुद्ध सुपर-८चा दुसरा सामना जिंकत उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवल्या.

Comments are closed.