पाकिस्तानसमोर सेमीफायनलचं अवघड कोडं; किती ओव्हरमध्ये चेस, किती धावांत विरोधकांना गुंडाळायचं?
T20 विश्वचषक 2026 पाकिस्तान सेमीफायनलची परिस्थिती : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये शुक्रवारी (27 फेब्रुवारी) झालेल्या सामन्यात इंग्लंडने हरलेली बाजी पलटवत न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवला. या पराभवानंतरही न्यूझीलंडचे सेमीफायनलचे स्वप्न जिवंत आहे, पण आता पाकिस्तानसमोर ‘करो या मरो’ अशी परिस्थिती उभी ठाकली आहे. सुपर-8 मधील ग्रुप-1 मधून दक्षिण आफ्रिका आधीच सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 1 मार्च रोजी होणाऱ्या सामन्यातील विजेता दुसरी जागा निश्चित करेल. ग्रुप-2 मधून इंग्लंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता उरलेली एकच जागा न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील चुरशीच्या शर्यतीतून ठरणार आहे.
डळमळीत सुरुवात असूनही, इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला #T20WorldCup उपांत्य फेरी 💪
दिवसाच्या नाटकावर अधिक वाचा 👉 https://t.co/TWrdtRiEp2 pic.twitter.com/Vq9hM4ct2R
— ICC (@ICC) २७ फेब्रुवारी २०२६
न्यूझीलंडचा रनरेट घसरला
इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडचा नेट रनरेट +1.390 वर आला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा नेट रनरेट -0.461 असा आहे. त्यामुळे केवळ विजय मिळवून पाकिस्तानचे काम भागणार नाही, तर त्यांना मोठ्या फरकाने जिंकणे अत्यावश्यक आहे.
पाकिस्तानचे सेमीफायनल समीकरण (Pakistan Semi Final Scenario)
पाकिस्तानचा सामना शनिवारी पल्लेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध होणार असून भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. जर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली, तर त्यांना किमान 64 धावांनी विजय मिळवावा लागेल. जर लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल, तर 13.3 षटकांत लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण झाल्यासच पाकिस्तान सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. अन्यथा न्यूझीलंड पुढे जाईल.
न्यूझीलंड अजूनही शर्यतीत
न्यूझीलंडला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला असला तरी ते स्पर्धेबाहेर गेलेले नाहीत. जर पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध 64 धावांपेक्षा कमी फरकाने विजय मिळाला किंवा लक्ष्याचा पाठलाग करताना 13.3 षटकांनंतर लक्ष्य गाठता आले, तर न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये पोहोचेल.
रेहान अहमद–विल जॅक्सची कमाल
160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था 16.5 षटकांत 6 बाद 117 अशी झाली होती. मात्र रेहान अहमद आणि विल जॅक्स यांनी अवघ्या 16 चेंडूत 44 धावांची झंझावाती भागीदारी करत सामना फिरवला. इंग्लंडने अखेर विजय मिळवत सुपर-8 फेरीत अपराजित कामगिरी कायम राखली. आता सर्वांच्या नजरा पाकिस्तान-श्रीलंका सामन्याकडे लागल्या आहेत. सेमीफायनलची शेवटची जागा कोण पटकावणार, याचा थरार शिगेला पोहोचला आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.