जम्मू-कश्मीरच रणजीचा राजा; पहिल्यावहिल्या जेतेपदाची औपचारिकता आज होणार पूर्ण
हुबळीच्या मैदानावर चौथ्या दिवशी जे दृश्य पाहायला मिळाले ते केवळ क्रिकेट नव्हते. तो एका नव्या राजाचा राज्याभिषेक होता. जम्मू-कश्मीरने रणजी ट्रॉफीच्या अंतिम लढतीत असा डाव टाकला की कर्नाटकचा दरारा क्षणात विरघळला आणि ‘रणजीचा राजा’ म्हणून कश्मीरचे नाव गाजू लागले. पहिल्या डावात 584 धावांचा डोंगर उभारल्यानंतर आज चौथ्या दिवशी त्यांनी कर्नाटकचा पहिला डाव 293 धावांत गुंडाळत 291 धावांची आघाडी घेतली. मग फॉलोऑन न देता स्वतःच दुसऱया डावाला उतरले आणि त्यांनी 4 बाद 186 अशी मजल मारत आपली आघाडी 477 इतकी वाढवली. त्यामुळे आता हा सामना अनिर्णित होणार हे स्पष्ट झालेय. परिणामतः जम्मू-कश्मीरचे जेतेपदही पक्के झालेय.
पाहुण्या संघाने आज सलामीवीर कामरान इक्बालच्या अभेद्य 94 धावांमुळे रणजीच्या राजमुपुटाच्या दिशेने आपली जोरदार पावले टाकली आहेत. कर्नाटककडून मयंक अगरवालची 160 धावांची झुंज एकाकी ठरली. पण या ऐतिहारिस विजयाचा खरा शिल्पकार ठरला आकीब नबी. त्याने 23 षटकांत 54 धावा देत पाच विकेट घेत कर्नाटकच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. त्याच्या कामगिरीने निवडकर्त्यांचेही लक्ष वेधले आहे. आगामी वर्षात तो हिंदुस्थानी गोलंदाजीच्या ताफ्यात दिसला तरी पुणालाही आश्चर्य वाटणार नाही.
Comments are closed.