Bolivia Plane Crash: बोलिव्हियात हवाई दलाचे विमान कोसळून भीषण अपघात; 15 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

साऊथ आफ्रिकेतील बोलिव्हियामध्ये शुक्रवारी सायंकाळी एक भीषण विमान अपघात झाला. बोलिव्हियामध्ये हवाई दलाचे ‘हर्क्युलिस’ (Hercules) विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एल अल्टो येथील एका रहदारीच्या गजबजलेल्या रस्त्यावर कोसळले. या भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हे विमान मध्यवर्ती बँकेच्या नवीन नोटा घेऊन जात होते. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्य़ा माहितीनुसार, हे विमान एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेत असताना तांत्रिक बिघाडामुळे लोकवस्ती असलेल्या भागात कोसळले. विमानाने थेट रस्त्यावरील वाहनांना धडक दिली, ज्यामुळे अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की विमानाचे अक्षरश: तुक़डे झाले. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.

या अपघाताचे काही धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विमानात बँकेच्या नोटा असल्याने, अपघातानंतर नोटांचे पुडके रस्त्यावर विखुरले होते. यावेळी काही स्थानिक नागरिक जीव धोक्यात घालून ढिगाऱ्यातून नोटा वेचताना दिसले. जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनाला पाण्याचा मारा करावा लागला. तसेच जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. बोलिव्हियाची राष्ट्रीय विमान कंपनी ‘बोलिव्हियाना डी एव्हिएशन’ने याबाबत माहिती दिली. अपघातग्रस्त विमान त्यांच्या ताफ्यातील नव्हते. समुद्र सपाटीपासून ४ हजार मीटर उंचीवर असलेले एल अल्टो हे बोलिव्हियातील अत्यंत गजबजलेले शहर मानले जाते. या अपघाताचा सखोल तपास करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

Comments are closed.