चंदीगडमधील शाळांवर पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी
पुढील दोन दिवसांत स्फोट होणार असल्याचा ईमेल
वृत्तसंस्था/ चंदीगड
केंद्रशासित प्रदेश चंदीगडमधील शाळांना पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली आहे. विवेक हायस्कूल आणि गुरुकुल भवन विद्यालय तसेच अन्य खासगी आणि शासकीय शाळांना ईमेलच्या माध्यमातून बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. ईमेल मिळताच शाळा व्यवस्थापनाने त्वरित प्रशासनाला कळविले होते. पुढील दोन दिवसांमध्ये पूर्ण चंदीगडमध्ये बॉम्बस्फोट होतील असे या ईमेलमध्ये नमूद होते. या धमकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले. तर ईमेलद्वारे पंजाबच्या सचिवालयालाही बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे.
ईमेलद्वारे धमकी मिळताच पोलीस अधिकारी, बॉम्बविरोधी पथक आणि श्वानपथकाने विविध शाळांच्या परिसरांमध्ये तपासणी केली आहे. या तपासणीत काहीच संशयास्पद आढळून आलेले नाही. तर सुरक्षेच्या कारणास्तव शाळांच्या आसपासच्या क्षेत्रातही देखरेख वाढविण्यात आली आहे. धमकीचा ईमेल कुठल्या आयडीद्वारे पाठविण्यात आला होता याचा शोध पोलीस घेत आहेत. यापूर्वी शहराच्या काही शिक्षणसंस्थांना अशाप्रकारचे ईमेल मिळाले होते.
Comments are closed.