T20 WC26: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाऊस पडला तर पाकिस्तान येईल गोत्यात? न्यूझीलंडला मात्र फायदा

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ सुपर-८च्या ग्रुप-२मध्ये उपांत्य फेरीसाठी चुरस निर्माण झाली आहे. शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध ४ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला आणि इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्याच्या निकालानंतर पाकिस्तानला फायदा झाला आहे. कारण त्यांच्यासाठी पुन्हा एकदा उपांत्य फेरीचे दार उघडले गेले आहे, मात्र त्यामध्ये पाऊस खेळ खराब करण्याची चिंता आहे. आज (२८ फेब्रुवारी) पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका असा सुपर-८चा सामना खेळला जाणार आहे. पाकिस्तानसाठी महत्वाचा असल्याने या सामन्यात हवामान आणि उपांत्य फेरीचे समीकरण कसे असेल हे जाणून घेऊ.
या स्पर्धेत पाकिस्तान कसातरी सुपर-८मध्ये पोहोचला आणि त्यामधील न्यूझीलंडविरुद्धचा पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरा सामना इंग्लंविरुद्ध २ विकेट्सने गमावला. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवला की पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचण्याची आशा आहे.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना पल्लेकेलेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. श्रीलंकेमध्ये या स्पर्धेतील जे सामने झाले त्यातील काही सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यामध्ये पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सुपर-८ सामन्याचाही समावेश आहे. अशावेळी आजही पाऊस झाला तर पाकिस्तानचे नुकसान होणार आहे. त्याचा फायदा मात्र न्यूझीलंडला होणार आहे.
पल्लेकेलेमध्ये हवामान उत्तम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. श्रीलंका हवामान विभागानुसार, पल्लेकेलेमध्ये शनिवारी (२८ फेब्रुवारी) पावसाचा अंदाज एक टक्का आहे. तसेच तापमान १९ ते २६ डिग्री सेल्सियस असेल. पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
या स्पर्धेत पाकिस्तान किंवा श्रीलंका संघासाठी आयसीसीने उपांत्य फेरी पोहचल्यावर तो सामना कोलंबोमध्ये खेळण्याचे ठरवले आहे. यामुळे पाकिस्तान त्यांचा उपांत्य फेरीचा सामना कोलंबोमध्ये खेळेल. ते उपांत्य फेरीत नाही पोहोचले तर तो सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.
हा सामना पाकिस्तानबरोबर न्यूझीलंडसाठीही महत्वाचा असणार आहे. ग्रुप-२ची अंकतालिका पाहिली तर इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचला आहे. न्यूझीलंड ३ अंकासह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचे २ सामन्यात एक अंक असून त्यांनी श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवला की त्याचा परिणाम नेट रनरेटवर होईल आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत जाईल.
उपांत्य फेरीत जाण्यासाठी पाकिस्तानला काय करावे लागेल?- पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध प्रथम गोलंदाजी केली आणि श्रीलंकेला १६०वर थांबवले तर पाकिस्तानला तो सामना १३.१ षटकातच जिंकावा लागेल. तसेच पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांनी १६०पेक्षा अधिक धावा केल्या तर तो सामना ६४ धावांनी जिंकावा लागेल.
दुसरीकडे श्रीलंकेने दोन्ही सुपर-८चे सामने गमावल्याने ते या स्पर्धेतून बाहेर झाला आहेत. यामुळे कदाचित त्यांचा शेवटचा सामना जिंकण्याचा प्रयत्न असू शकतो. ही न्यूझीलंडसाठी उत्तम ठरेल.
Comments are closed.