T20 WC 2026 – पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीची संधी; आज कॅण्डीत पाकिस्तान-श्रीलंका सामना
शुक्र है शुक्रवार है… काल इंग्लंडने न्यूझीलंडचा रोमहर्षक सामन्यात पराभव करत स्पर्धेबाहेर फेकल्या गेलेल्या पाकिस्तानला पुन्हा मैदानात आणले आहे. त्यामुळे पाकिस्तानला बाद झालेल्या यजमान श्रीलंकेचा मोठय़ा फरकाने पराभव करून थेट उपांत्य फेरीत धडक मारण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. दुसरीकडे श्रीलंका आपल्या वर्ल्ड कप अभियानाचे हॅपी एण्डिंग करण्याचे ध्येय घेऊन उतरणार आहेत. काल न्यूझीलंड जिंकणार आणि पाकिस्तान आपोआप बाद होणार, असे संकेत मिळत होते, पण शुक्रवारी त्यांनी खुदाकडे केलेली दुआ फळास आली. हरता हरता इंग्लंडने सामना जिंकला. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी पुन्हा एकदा उपांत्य फेरीचा राजमार्ग तयार झाला आहे.
पाकिस्तानला पेटून उठण्याची गरज
एकीकडे श्रीलंकेचा संघ चाहत्यांच्या नाराजीमुळे खूपच दुखावला आहे. न्यूझीलंडविरुद्ध हरल्यामुळे लंकेचा संघ अक्षरशः खचला आहे. या पराभवामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. त्यामुळे लंकेसाठी हा निव्वळ सामना असला तरी पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचा मार्ग आहे. पण त्यासाठी पाकिस्तानला पेटून उठावे लागणार आहे. पाकिस्तानी फलंदाजी आता साहिबजादा फरहानच्या अवतीभवतीच आहे. त्याने 283 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. बाकी मंडळी, तिहेरी आकडा गाठायलाही धडपडताहेत. शादाब खान 111 धावांसह दुसऱया क्रमांकावर. बाबर आझम (91), सइम अयूब (70), सलमान आगा (44) यांच्याकडून अपेक्षाभंगच झाला आहे. गोलंदाजीत उस्मान तारिकचे 10 विकेट आणि शाहीन आफ्रिदीची चमक पाकिस्तानला बळ देत असली, तरी विजयासाठी एकत्रित कामगिरी आवश्यक आहे.
पाकिस्तानला हवाय फक्त ६४ धावांचा विजय
पाकिस्तानला नवसंजीवनी मिळाली असून त्यांना श्रीलंकेचा 64 धावांनी पराभव किंवा विजयाचा पाठलाग करताना लक्ष्य 13.1 षटकांत गाठले तर ते उपांत्य फेरीत पोहोचलेच समजा. जर हा आकडा गाठण्यात पाकिस्तान यशस्वी ठरला तर उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल.
Comments are closed.