श्रीलंकेसमोर मोठी अडचण! पाकिस्तानला हरवले तर सेमीफायनल भारतात, स्वत: हरले तर कोटींचा फायदा

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मधून श्रीलंका आधीच बाहेर झाला आहे. आज (२८ फेब्रुवारी) त्यांचा सुपर-८ शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. हा सामना पल्लेकेलेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना पाकिस्तान, न्यूझीलंडबरोबर श्रीलंकेसाठीही महत्वाचा असणार आहे. ते कसे जाणून घेऊ.
सुपर-८च्या ग्रुप-२मध्ये पहिल्या स्थानावर असलेला इंग्लंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. न्यूझीलंड ३ अंक आणि +१.३९० नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचे एक अंक असून ते -०.४६१ नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचे सुपर-८चे सर्व सामने खेळून झाले असून पाकिस्तानकडे उपांत्य फेरीत जाण्यासाठी आज शेवटची संधी आहे. यामुळे त्यांना श्रीलंकेला ६४ धावांनी पराभूत किंवा लक्ष्याचा पाठलाग १३.१ षटकात पूर्ण करावे लागणार आहे.
श्रीलंका आधीच बाहेर झाल्याने त्यांच्यासाठी हा सामना तसा महत्वाचा नाही, मात्र नैतिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून पाहिले तर तो अतिमहत्वाचा आहे. श्रीलंकेने हा सामना जिंकला तर पाकिस्तान बाहेर जाईल आणि त्याचबरोबर उपांत्य फेरीचे सामने भारतात होतील. आयसीसीने पाकिस्तान उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत पोहोचला तर ते सामने कोलंबोमध्ये खेळण्याचे योजिले आहे, हा निर्णय स्पर्धेआधीच झाला होता.
तसेच भारत आणि पाकिस्तान दोघे बाद फेरीत समोरा-समोर आले तर स्पर्धा आणखी रोमांचक होईल. भारत-पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला तर तो सामना कोलंबोमध्ये होईल आणि श्रीलंकेला आर्थिक फायदा होईल. त्यामुळे त्यांच्या क्रिकेट बोर्डसाठी हे उत्तम आहे.
दुसरीकडे श्रीलंकेच्या खेळाडूंनी मुद्दाम सामना गमावला, तर त्यांच्या प्रतिमेला तडा जाईल. विश्वचषकासारख्या स्पर्धेमध्ये खेळ हा निष्पक्षता खेळला पाहिजे. तसेच त्याचा जागतिक स्तरावरही मोठा परिणाम होईल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले होते, तेव्हा पाकिस्तान त्या स्पर्धेचा यजमान होता. आता भारत टी२० विश्वचषकाचा यजमान असून श्रीलंकेनेही सहयजमानपद भुषविले आणि पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळले गेले.
Comments are closed.